मुलीचा विवाह आपल्यासोबत करून न दिल्याने एकाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून मुलीच्या वडिलांचे अपहरण केले.मंगळवेढ्यापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी अपहृताची सुटका केली.
घराशेजारील मुलीचा विवाह आपल्यासोबत करून न दिल्याने एकाचे अपहरण केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जखमी केले. साखरे वस्ती, हिंजवडी येथे हा प्रकार घडला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी अपहृताची सुटका केली.
शाम मोरेकर (वय ३०), असे सुटका करण्यात आलेल्या अपहृताचे नाव आहे. विलास वाघमारे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काळूराम मारुती हुलावळे (वय ५५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक नामदेव अंगज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम मोरेकर हे फिर्यादी हुलावळे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. तसेच मोरेकर व आरोपी वाघमारे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
मोरेकर यांच्या परिसरातील एका मुलीचे आरोपी विलास वाघमारे याच्यासोबत लग्न लावून दिले नव्हते. त्याचा राग विलास याच्या मनात होता. त्या कारणावरून सोमवारी रात्री विलास आणि त्याच्या दोन साथीदारांनी मोरेकर यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून पळवून नेले.
आरोपी यांनी मोरेकर यांना पळवून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोरेकर यांचे घरमालक हुलावळे यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी लागलीच आरोपी यांचा पाठलाग सुरू केला. आरोपी हे मोरेकर यांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे घेऊन जात होते.
दरम्यान पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच आरोपी यांनी मोरेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात मोरेकर जखमी झाले. त्यानंतर आरोपी यांनी मोरेकर यांना रस्त्यातच सोडून देऊन धूम ठोकली.
पोलिसांनी दोन आरोपी यांना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे. जखमी अवस्थेतील मोरेकर यांना पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरात आणून एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज