राज्यात सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर आहेत असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.ते सोलापुरात बोलत होते. It takes breath to run a government; Chief Minister Uddhav Thackeray Thiller, Fadnavis’s attack
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यात माढा आणि करमाळा तालुक्यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अकोला (ता. माढा) येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे.आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी.
केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे 60 हजार कोटींचा जीएसटी थकल्याच्या आरोपाचे खंडन केले.
राज्यावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना मदत करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली होती. आता केंद्राची वाट का? असा सवाल उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप ही त्यांनी केला.
यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतन केदार, राजाभाऊ जगदाळे आदीजण उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला! बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा केंद्राकडे मदत मागावी
भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी या हेतूने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत लगावला.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुण्यातील काही भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या बळिराजाच्या डोळ्यात पाणी आले असून अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
त्यांनी काय मागण्यापेक्षा, त्यांना काय देता येईल याकडे सरकारचे लक्ष आहे. विरोधकांनी यामध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्रित येऊन मदतीची मागणी करावी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. केंद्र सरकारने ही मदत देण्याची ग्वाही दिली असून विरोधकांनी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा केंद्राकडून ही मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
विरोधक हे आपल्याच राज्यातील असून परराज्यातील वा परदेशातील नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत लगावला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज