टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा मतदारसंघात मतदानाच्यावेळी अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे एकंदरीतच माढ्याचा निकाल अत्यंत अटी-तटीत सुटणार अशा चर्चा गाव-खेड्याच्या पारावर सुरू आहेत.
फलटण आणि माण खटावमध्ये भाजप उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांना भरभरून मतदान झाल्याच्या चर्चा आहेत. तर माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना भरभरून मतदान झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निकालाचा अंदाज वर्तवणं तसं अवघडंच आहे.
मतदारराजाचा कौल मतपेटीत बंद झालाय, सर्वांना आतुरता आहे, 4 जूनच्या मतमोजणीची. त्यामुळे माढ्यात गुलाल कोण उधणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
दिवसभर असणारे 44 डिग्री पेक्षा जास्त अपमानामुळे सकाळी लवकर आणि संध्याकाळीपूर्वी ठिकठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. माढा लोकसभेत 12 लाख 67 हजार 530 म्हणजे जवळपास 63.65 टक्के मतदान झालं आहे.
यात सर्वात जास्त मतदान हे फलटण येथे 64.23 टक्के तर सर्वात कमी मतदान करमाळा येथे 55.88 टक्के झालं आहे. माढा तालुका 66.13 टक्के, माळशिरस 60.38 टक्के, माण 61.56 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्वात तणावपूर्ण स्थिती सांगोला तालुक्यात होती.
सांगोला तालुक्यात देखील 64.03 टक्के मतदान होताना हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटना समोर आल्या होत्या. यात बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोचल्यानं पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही. करमाळा शहरामध्ये दिवसभर शांततेत मतदान झालं असताना संध्याकाळी एका तरुणानं खिशात आणलेल्या हातोडीनं ईव्हीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न केला.
माढ्यात मनोज जरांगे इफेक्टनं धाकधूक वाढवली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत मनोज जरंगे यांचा इफेक्ट माढा, सांगोला आणि करमाळा तालुक्यात चांगलाच जाणवला. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी मराठा आरक्षणामुळे आपला राग सत्ताधारी भाजपवर काढल्याचं चित्र दिसत होतं.
याचवेळी ओबीसी मतदारांनीही भाजपाला भरभरून मतदान केल्याचे समोर आले . या मतदानात जरांगे फॅक्टर सरस ठरणार कि ओबीसी मतदान हे देखील 4 जून रोजी समोर येणार आहे .
माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झालेले दिसले असले तरी काही ठिकाणी मात्र एक गट तुतारीच्या मागे गेला आहे .
सांगोला तालुक्यातही अश्याच प्रकारची स्थिती असून आमदार शहाजीबापू आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी संपूर्ण ताकद लावल्याने या भागात जरांगे इफेक्ट कमी दिसला.
माढ्याचा निकाल खरा फलटण आणि माण खटाव विरुद्ध माळशिरस यावरच ठरणार आहे. इतर मतदारसंघात कोठेही कोणत्याच पक्षाला मोठे लीड मिळण्याची शक्यता नाही. यात सर्वात महत्वाचा असणारा वंचित फॅक्टर किती चालणार आणि तो कोणाची मतं घेतं यावर संपूर्ण निकाल अवलंबून असणार आहे.
मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाज हा शरद पवार गट आणि वंचित या दोघात विभागाला जाणार आहे. याच पद्धतीनं दलित मतात देखील यावेळी मोठी विभागणी झाली असून आज माढ्याचा नेमका अंदाज बांधणं शक्य नाही,
तरी येणाऱ्या निकालात भाजपचे निंबाळकर किंवा राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते यांच्यात जिंकणाऱ्याचं मताधिक्य हे 15 ते 25 हजारात असणार असल्याचं बोललं जातं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज