मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कलावंताचे माहेरघर म्हणून लौकीक असलेल्या मरवडे फेस्टीव्हलला 12 मार्च पासून आरंभ होणार असून या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर भरविण्यात येणार्या कुस्तीच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मरवडे गावयात्रेला जोडूनच मरवडे फेस्टीव्हलचे छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात येते. यंदाच्या 21 व्या मरवडे फेस्टीव्हलचे उदघाटन उद्योगपती सुरेशराव येलपले पाटील यांच्या हस्ते 12 मार्च रोजी सायं. 7 वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. ताई मासाळ या भूषविणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर चे शिवशाहीर रंगराव पाटील यांचा ‘शिवशाही ते लोकशाही ‘ हा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक हणमंतराव दुधाळ यांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी रंगभरण, चित्रकला स्पर्धा होणार असून रात्री आदर्श ग्राम पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ‘पाटोद्याची विकासगाथा ‘ या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी मरवडे गावातील उद्योगशिल युवकांचा गौरव केला जाणार आहे. शनिवार दि. 14 रोजी सकाळी 10 वाजता विविध वयोगटानुसार सदृढ बालक स्पर्धा घेण्यात येणार असून रात्री 8 वाजता तुंग (सांगली ) येथील “भूपाळी ते भैरवी ” हा लोककलांचा कार्यक्रम संपन्न होईल.
रविवार दि. 15 रोजी सकाळी रांगोळी व मेहंदी रंगवा स्पर्धा होणार असून याच दिवशी रात्री अमरावती येथील कलापथक ” संदीपपालची सतर्कवाणी ” हा उदबोधक कार्यक्रम सादर करणार असून यावेळी मान्यवरांचे हस्ते मरवडे फेस्टीव्हल निमित्त देण्यात येणार्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणार्या या संपूर्ण सोहळ्याची सांगता सातारा येथील दुर्गेशनंदिनी कला अकॅडमी च्या ” नाद रंग ” या नृत्य जल्लोषी कार्यक्रमाने होणार आहे.
या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी , सिद्धेश्वर रोंगे, ज्ञानेश्वर कुंभार, देविदास चौधरी, अरुण सरडे, शशिकांत घाडगे, दत्तात्रय मासाळ व छत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज