टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील वर्षीपर्यंत पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्डवरील आधार कार्डच्या छपाईस बंदी होती. पण आता नागरिकांची सोय व्हावी म्हणून सरकारने पीव्हीसी कार्डवर आधार कार्ड छापण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे.
खुद्द यूआयडीएआयनेच (UIDAI) ही सुविधा दिली आहे. आता तुम्ही केवळ स्वत:साठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड UIDAIच्या वेबसाइटवरून मागवू शकता.
PVC आधार कार्डची वैशिष्ट्ये-
पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डासारखेच असते. यामुळे ते PVC आधारकार्ड खराब होण्याची किंवा तुटून पडण्याची भीती राहत नाही. तसेच नवीन पीव्हीसी आधार कार्डमध्ये अनेक नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये असणार आहेत.
फक्त 50 रुपयांत मिळणार आधारकार्ड–
पीव्हीसी कार्डवर आधार छापण्यासाठी आणि ते घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जेवढ्या लोकांचे पीव्हीसी आधार कार्ड मागवायचे असेल तेवढे शुल्क जमा करावे लागेल. उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबात पाच लोक असतील तर तुम्हाला 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
या लिंकवर जा-
पीव्हीसी आधार कार्ड मागवण्यासाठी या लिंकवर – https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर येणारा तुमच्या स्क्रीनवरील सिक्युरिटी कोडही प्रविष्ट करावा लागेल.
कुटुंबातील इतर सदस्यांचेही आधार मागवू शकाल–
पुढे मोबाइल क्रमांक नोंदणी आहे किंवा नाही असे दोन पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांसाठी पीव्हीसी आधार कार्ड घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांचा आधार क्रमांक आणि तुमचा मोबाइल क्रमांक टाकून ओटीपी मागवू शकता.
आधार ट्रॅकही करता येणार
आधार क्रमांक, सिक्युरिटी कोड आणि ओटीपी टाकल्यानंतर तुमचे आधार कार्ड तपशील दिसतील. ते तपासून पाहिल्यानंतर पेमेंट करा. पेमेंटसाठी तुम्हाला यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड पेमेंटसारखे पर्याय आढळतील.
पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्याची पावती डाउनलोड करू शकता. डाऊनलोड केलेल्या पावतीवरील 28 अंकी सर्व्हिस रिक्वेस्ट नंबरवरून तुम्ही आधार ट्रॅक करू शकाल.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज