टीम मंगळवेढा टाईम्स।
मुलगा होत नसल्याने पत्नी व तीन मुलींना एका खोलीत महिलेच्या पतीनेच गेल्या दीड वर्षापासून डांबून ठेवून शारीरिक व मानसिक अत्याचार केले असल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.
या महिलेसह तीन लहान मुलींची सुटका निर्भया महिला पथकाने केली असून महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीस दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील झेंडे गल्ली येथील मारुती बुवा कराडकर महाराज मठासमोर एका घरात एक महिला व तीन मुलींना डांबून ठेवल्याची आणि अत्याचार केल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार तातडीने निर्भया पथकाने साध्या वेशात जावून खातरजमा करीत माहिती घेतली. खात्री पटताच त्यांची सुटका केली आहे. या प्रकरणी दत्तात्रय कृष्णा बरडे (वय 46, रा. झेंडेगल्ली) याला अटक करण्यात आली आहे .
दत्तात्रय बरडे याला सलग तीन मुलीच झाल्या. मुलगा झाला नाही म्हणून बरडे याने पत्नीला व स्वत:च्या 14, 11 व 9 वर्ष वयांच्या तीन मुलींना देखील गेल्या दीड वर्षांपासून डांबून ठेवले होते.
या घटनेबाबत निर्भया पथकास माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे निर्भया पथक त्या ठिकाणी गेले असता हा प्रकार आढळून आला. दत्तात्रय बरडे याची पत्नी व तिच्या तीन मुली अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
पंढरपूर शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दत्तात्रय बरडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता या महिलेने आपल्या पतीनेच हे कृत्य केल्याचे सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून मुलींसह आपल्याला आपल्या पतीने डांबून ठेवले आहे.
आपल्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत, अशी माहिती या महिलेने दिली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
-विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज