टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी दि.२२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अचानक येथे दाखल होत एकट्यांनीच शहरातून फेरफटका मारला. कायदा सुव्यवस्थेचा अंदाज घेत फिरून पाहणी केली आणि मंगळवेढा येथेच मुक्काम केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यांवर जरब बसण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलीस खात्यात राहून पोलीस खात्याची विविध कारणांमुळे बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच येथील काही वसुलदार पोलिसांना सोलापूर येथे मुख्यालयात घेत त्यांना प्रबोधन शिबिरात सहभागी होण्यास सांगितले आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, कोणावर विनाकारण अन्याय होऊ नये, यासाठी पोलिसांना सक्त सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमिवर कायदा, सुव्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दि.२२ रोजी रात्री उशिरा खासगी कामानिमित्त मंगळवेढा येथे दौरा केला. याची कल्पना येथील कोणत्याच पोलीस अधिकाऱ्यांना नव्हती. त्यांनी रात्री उशिरा मंगळवेढा शहरात स्कूटीवरून फेरफटका मारत सर्वत्र पाहणी केली. तसेच काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर रात्री त्यांनी येथील आपल्या मैत्रिणीकडे मुक्काम करून सकाळी लवकर त्या मार्गस्थ झाल्या.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या प्रमुख असणाऱ्या सातपुते या मंगळवेढ्यात येऊन रात्री मुक्काम करून सकाळी निघून गेल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांना घाम फुटला. त्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करून दौऱ्याचे नियोजनाबाबत माहिती विचारण्याचा देखील प्रयत्न केला.
एखादा वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल होतो,याची साधी कुणकुण देखील इथल्या पोलिसांना मिळत नाही, त्यावरून स्थानिक पोलिस आणि त्यांची गोपनीय यंत्रणा किती अलर्ट आहेत, हे दिसून येते. सध्या शहर व तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना या दौऱ्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
दरम्यान आजपर्यंतच्या कोणत्याही पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांनी कोणत्यातरी गावात जाऊन फेरफटका मारला नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुपचुप शहरात येऊन पाहणी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तपास कामाबाबत संबंधितांना आदेश
कामती येथील काम आटोपून दि.२२ रोजी रात्री उशिरा मंगळवेढा येथील माझ्या मैत्रिणीकडे मुक्कामी आले होते. शहरात फेरफटका मारून पाहणी केली. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील वाढत्या चोऱ्या रोखणे व तपास कामाबाबत संबंधितांना आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी बोलताना दिली.(Source : पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज