टीम मंगळवेढा टाईम्स ।
संस्था चांगली चालविण्याच्या करिता त्या-त्या संस्था चालकांनी किंवा संचालक बोर्डाने पण प्रयत्न केले पाहिजेत. टाळी ही एका हाताने वाजत नाही.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मागे पैसे दिलेले होते. त्या पैशाचे काय झाले ? असा सवाल उपस्थित करीत श्री पांडुरंगाच्या नावाचा हा कारखाना आहे.
त्या नावाला साजेसं असंच काम या ठिकाणी झालं पाहिजे असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते. मंदिरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा बंद आहे. तसेच शेतकऱ्यांची मागील हंगामातील ऊस बिले, तोडणी वाहतूक आणि कामगारांची देणी कारखान्याने थकवलेली आहेत.
यानुषंगाने कांही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात विरोधकांच्या आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी कारखान्याला मदत करण्याचे सुतोवाच केलेले होते.
याविषयी पत्रकारांनी छेडले असता ना.पवार म्हणाले, ज्या सहकारी संस्थांना त्यांच्या काही चुका नसताना मदत करणे गरजेचे असेल, तर तिथं त्यांना मदत केली जाते.
मध्यंतरी कल्याणराव काळे व इतरांना सरकारने मदत केली. अशाच प्रकारे आ.भारत भालके होते, त्यावेळी श्री विठ्ठल कारखान्याला पैसे दिले होते. त्याचे काय झाले ? शेवटी हा जनतेचा पैसा आहे हे आपण जाणताच.
कारखान्याला मदतीची आशा आणखी धूसर
विधानसभा पोटनिवडणूक झाल्यापासून कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे ‘नॉटरिचेबल’ आहेत. कारखानाही सुरू झालेला नसल्याने श्री विठ्ठल परिवाराचे कार्यकर्ते आणि समर्थक शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
दरम्यान, भालके हे कारखाना सुरू करण्यासाठी धडपडत असून सातत्याने पुणे, मुंबईत थांबून पैसे उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.
असे असताना खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे कारखान्याला मदत करणे शक्य नसल्याचेच अप्रत्यक्षपणे सुचित केले.
मागे दिलेल्या पैशाचे काय झाले ? सवालच त्यांची उपस्थित केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज