टीम मंगळवेढा टाईम्स ।
कार्तिकी यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातल्याने वारकरी महाराज मंडळीतून नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्तिकीसाठी वारकऱ्यांना बंदी असेल तर आमचा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध राहिल असा इशारा वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी दिला.
कार्तिकी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाने संचार बंदीसह इतर काही निर्बंध घातले आहेत. या संदर्भात आज पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील वासकर महाराज मठात वारकरी पाईक संघाची बैठक पार झाली.
त्यानंतर वासकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध असल्याचे स्पष्ट केले.प्रतिकात्मक पध्दतीने वारी होणार असेल तर शासकीय महापूजा देखील पंढरपुरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.
वारी संदर्भात सरकारकडे एक प्रस्ताव दिला होता. परंतु त्या प्रस्तावावर देखील कोणतीच चर्चा केली नाही. प्रशासनाने वारकरी संप्रदायाला विचारात न घेता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे येत्या विधान परिषदेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा ही निर्णय घेण्यात आल्याचेही वासकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.
कार्तिकी यात्रा रद्दच
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता यंदाची पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कार्तिकी सोहळा यंदा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होणार आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.
ता. 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्तिकी यात्रा रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव पंढरपूर मंदिर समितीने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला होता,
शासनाकडून त्याला मान्यता मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली. या शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालख्या आणि दिंड्याना यात्रा काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.शहर व परिसरातील सुमारे 350 मठ बंद ठेवण्यात येणार आहेत.सध्या पुणे विभागात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात निवडणूक होत असल्याने आचार संहिता लागू आहे. यामुळे कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडेच वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज