टीम मंगळवेढा टाईम्स ।
बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांनी पकडून वाळूसह 1 लाख 4 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात टेम्पो चालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की मंगळवेढा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन येत असल्याचे गोपनीय माहिती पोलीसांना मिळताच दि.18 रोजी पहाटे 5 वाजता बोराळे नाका चौकात पोलीसांचे पथक फिल्डींग लावून थांबले होते.
यादरम्यान एम.एच 13 आर 3611 या नंबरचा टेम्पो नंबरवर खाडाखोड करून हौद्यात वाळू घेवून आल्याचे पथकाच्या निर्देशनास आले. पोलीसांनी ईशारा करून चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक जागेवर वाहन सोडून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलीसांनी वाळूसह 1 लाख 4 हजार किमतीचा टेम्पो जप्त केला असून तो पोलीस स्टेशन आवारात आणून लावला आहे. याची फिर्यादी पोलीस शिपाई गणेश सोलनकर यांनी दिल्यावर अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने तहसिलदार यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी सोमवार ते रविवार या दरम्यान सलग तलाठी व अन्य कर्मचार्यांची पथके नेमली असतानाही मंगळवेढा शहरात रात्रीच्या दरम्यान वाळू विविध बांधकामाच्या ठिकाणी येऊन पडत असल्याचे चित्र आहे.
पथके नेमले असताना आठवडाभर सलग त्यांचे कामकाज चालते का? या वर प्रश्न चिन्ह असून वरिष्ठ अधिकार्यांनी ही पथके रात्रभर फिरतात का याचा छुप्या पद्धतीने मागोवा घ्यावा. अशी मागणी जनतेमधून पुढे येत आहे. अन्यथा नेमलेली पथके हा नुसता फार्स ठरण्याची शक्यता सुज्ञ नागरिकां मधून वर्तवली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज