विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास आम्ही दंड भरणार नाही, माझी मोटारसायकल अडवायचा काय संबंध? तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत ते? दोनच मिनिटांत तुझी नोकरी घालवतो अशी धमकी देत अंगावर धावून गेल्या प्रकरणी सरकोलीच्या दोघांविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या तोंडावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून शासनाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तशी सूचना दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली होती.
त्याच अनुषंगाने मंगळवेढा शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली.दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे आपल्या पथकानुसार शुक्रवारी (ता. 30) दुपारी विना मास्क दुचाकीस्वांरावर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात थांबले होते.
तेव्हा गणेश रामहरी भोसले, जगदीश रामहरी भोसले (रा. सरकोली) हे दोघे त्यांच्या मालकीच्या दुचाकी (एमएच 13 डीएच 2315) वरून विना मास्क जात असताना पोलिस उपनिरीक्षक पुजारी यांनी त्यांना अडवले.
विना मास्क असल्यामुळे पाचशे रुपये दंडाच्या रकमेची मागणी केली असता गणेश भोसले व जगदीश भोसले यांनी पोलिसांशी वाद घालून “आम्ही दंड भरणार नाही, तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत ते? दोनच मिनिटांत तुझी नोकरी घालवतो’, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी गणेश व जगदीश भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांशी तुलना करता मंगळवेढामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश येत आहे.
अशा परिस्थितीत प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना सर्वसामान्य नागरिकांतून पोलिस कारवाईला अडथळा निर्माण होत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येण्यास वेळ लागणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज