टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे (ता . करवीर) येथे उसतोडणीसाठी आलेल्या मुजराच्या दोन महिन्याच्या बालकाचा झोळीतून पडून शुक्रवारी मृत्यू झाला.
वृषभ रणजीत मरेआईवाले ( रा . खुपसंगी ता.मंगळवेढा) असे बालकाचे नाव आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

याबाबतची माहिती अशी, मरेआईवाले कुटुंब उसतोडणीसाठी कोल्हापुरात आले आहे. वळीवडे येथे त्यांचे काम सुरु आहे. मंगळवारी हे कुटुंब आपल्या दोन महिन्याच्या बालकास साडीच्या झोळीत ठेवून ऊस तोडण्याच्या कामात व्यस्त होते.

दरम्यान, बालक झोळीतून पडल्याने रडू लागले. बालकाच्या आईने त्याला शांत केले. मात्र दुसऱ्यादिवशी बालकाकडून कमी प्रतिसाद मिळू लागला.
मरेआईवाले दाम्पत्याने वळीवडे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गुरुवारी वृषभला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सीपीआरमध्ये दाखल केले.
यावेळी तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाच्या डोक्यात मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









