टीम मंगळवेढा टाईम्स।
चोपडा (जि. जळगाव) अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण पोलिस आहे. तर तिसरा पसार झाला आहे.
निलंबित पोलिस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते (३५, रा.पंढरपूर, जि. सोलापूर) आणि विनायक सुरेश चवरे (३५, रा. गोविंदपुरा, पंढरपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील देवकाते हा निलंबित पोलिस कर्मचारी असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जितेंद्र गोपाल महाजन व सचिन अरुण पाटील यांना त्या दोघांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली आणि पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
दरम्यान, चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी पोलिसांना कळविली.
पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठले असता तिथे तीनही जण संशयितरीत्या फिरताना आढळले. यातील दोघांना लागलीच पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
गुन्हा दाखल करू नये, यासाठी आरोपींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आरोपींकडील चारचाकी वाहनावरही बनावट वाहन क्रमांक आढळून आला आहे.
जितेंद्र गोपाल महाजन (२८, रा. लोहियानगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत.
पालकमंत्र्याच्या नातेवाईकाला चुना
■ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तरडी (ता. शिरपूर) येथील नातेवाइकांनाही या तोतया अधिकाऱ्यांनी एक लाखाचा चुना लावल्याची माहिती पोलिसांनी दिली.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज