टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथे भिमा नदीपात्रात असलेल्या श्री जटाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहत गेलेला परराज्यातील २५ वर्षीय तरूण तसेच उचेठाण येथे भिमा नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याखाली ३७ वर्षीय तरूण पाण्यात बुडून दोघे मयत झाल्याची घटना घडली असून या दोन्ही घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे.
पहिल्या घटनेत यातील मयत अर्जुन बीजेराम धुर्वे (वय २५ रा.कोसमी, मध्यप्रदेश) हा दि.२० जानेवारी रोजी दुपारी ३.०० वा. तीर्थक्षेत्र माचणूर येथील सिध्देश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला होता.
तो भिमा नदीपात्रात असलेल्या जटाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पाण्यामध्ये पोहोत गेल्यावर तो पाण्यात बुडून मयत झाला असल्याची खबर दिपक धुर्वे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत यातील मयत युवराज गोपीनाथ धुमाळ (वय ३७ रा. खंडोबा गल्ली, मंगळवेढा) हा दि.२१ रोजी सकाळी ११.१५ वा. उचेठाण येथील भिमा नदीपात्रात बंधाऱ्याच्या खाली बुडत असताना काही मासेमारी लोकांनी पाहिले.
व त्यांना नदीपात्रातून बाहेर काढून १०८ अॅब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून तो मयत झाला असल्याचे सांगितले.
याची खबर महादेव धुमाळ यांनी पोलिसात दिल्यावर या घटनेची नोंद अकस्मात मयत अशी झाली असून अधिक तपास पोलिस नाईक चंदनशिवे हे करीत आहेत.
दरम्यान सोलापूर शहरासाठी भिमा नदीपात्रात उजनी धरणातून नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे. या दोन्ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडल्या तेथे को.प.बंधारे असल्याने नदीचे पात्र काठोकाठ भरल्याचे चित्र असून या पाण्यात दोघेजण एकाचवेळी मयत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज