मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आज अख्खा भाजप माझ्याविरुद्ध आहे,” असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरलं, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते असा सवाल विचारत उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असा दावा त्यांनी केला.
‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून आज मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग प्रकाशित झाला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात.
तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत.
“एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना… त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठिशी आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय,” असंही त्यांनी म्हटलं.
कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका भाजपने विरोधी पक्षांनी बोलावलेल्या बैठकीवर केली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “ते असं म्हणताहेत ना की परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का? जसं बंगळुरुला परिवार वाचवण्यासाठी हे लोक एकत्र आले असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय… परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत.
माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे.
महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रुपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावाने झालंय म्हणून इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच, इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच बनणार! असं जर का चालू राहिलं तर कठीण आहे. ज्या पद्धतीने आता हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालंय, ते कसं झालंय हे गावागावातलं अगदी साधं पोरसुद्धा सांगेल की कसे हे जन्माला आले आहेत.
अशा पद्धतीने उद्या कोणीही… म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला… उद्या खोके घेऊन येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल.
भाजपमध्येसुद्धा राम आता राहिलेला नाहीये. आहेत ते फक्त आयाराम आहेत. भाजपचा राम कधीच गेलेला आहे. आहेत ते फक्त आयाराम, बाकी गयाराम. हा सगळा आयारामांचा पक्ष आहे. तर आयारामांना तुम्ही सामावून घेताना मुळात तुमच्या पक्षातला जो राम होता, त्याला आता तुम्ही फक्त कामापुरता वापरणार का? की त्याला पण तुम्ही संधी देणार आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज