मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
आज आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. त्याशिवाय गुजरातमध्ये हरियाली अमावस्या, कर्नाटकात भीमाना अमावस्या तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते.
जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. चातुर्मासातील पहिली अमावस्या झाल्यानंतर श्रावणाला सुरुवात होते. आजच्या अमावस्येला दिव्यांची पहाट असंही संबोधलं जातं.
आज घरात दिवे लावून आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व असतो.
आज पितरांसाठी यज्ञ आणि दान केल्याने पुण्य लाभतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. ही दिव्यांची पूजा म्हणजे श्रावणाच्या आगमानाची तयारी आणि स्वागत म्हणून केली जाते. असं म्हणतात की, आजच्या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला लावला पाहिजे.
घरातील दक्षिण ही पितरांची दिशा असते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. म्हणून आजच्या अमावस्येला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी शांती लाभते.
अशी करा पूजा!
आज घरातील सर्व दिवे स्वच्छ करा. पूजा घराजवळ एक पाट ठेवा आणि त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढ. पाटावर स्वच्छ लाल वस्त्र घालून त्यावर दिव्यांची मांडणी करा. हे दिवे तिळाच्या तेल किंवा तुपाने प्रज्वलित करा. दिव्यांना फुलं अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. अनेक ठिकाणी आजच्या दिवशी पुरणाचे दिंड बनवण्याची प्रथा आहे.
पूजा झाल्यानंतर ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’, या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.
दीप अमावस्या महत्व
दीप अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा सण असतो. दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. त्यामुळे हिंदू धर्मात चांगल्या वाईट प्रसंगी दिव्या लावण्याची परंपरा आणि प्रथा आहे. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा ही मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात आणते.
आजच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित नक्की करा. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद मिळतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(माहितीसाठी – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. मंगळवेढा टाईम्स न्युज या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज