टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे.
त्याचाच परिणाम सध्या सोलापूर जिल्ह्याला तसेच ग्रामीण भागातील गावे, वाड्या वस्त्यांना बसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांत सकाळी ६ ते ९ या वेळेत भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे.
विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच सकाळच्या सत्रात पाणी तापविण्यासाठी गिझर व नळाला आलेले पाणी विद्युत मोटारीने उपसा करण्यात येत असल्याने सकाळच्या सत्रात सर्वाधिक विजेचा वापर होत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीजग्राहकांनी मागणी व यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा , असे आवाहन महावितरणकडून यापूर्वीच करण्यात आले होते.
सध्या शेतीपंपासाठी जास्त प्रमाणात वीज वापरली जात नसली तरी , ऑक्टोबर हीटमुळे वाढलेल्या उकाड्यामुळे कुलर , एसी , पंख्यांचा वापर वाढला आहे , त्यामुळे मागणीच्या प्रमाणात विजेचा पुरवठा होत नसल्याने महावितरणकडून भारनियमन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे .(स्रोत:लोकमत)
वीज निर्मिती करणारे १३ संच बंद पडले
महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत . यात महानिर्मितीचे चंद्रपूर , भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॅटचे , तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे . यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे ( गुजरात ) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे ( अमरावती ) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत . यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज