टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे चोरट्यांनी अक्षरशःधुमाकूळ घालून जवळपास अर्धा डझन चोऱ्या केल्या आहेत. यामध्ये किराणा दुकान, मेडिकल फोडून रोख रक्कम , मोटर सायकल असा १ लाख १३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, एकाच रात्री मोठया प्रमाणात चोऱ्या झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अशोक लाड (रा.सिध्दापूर) यांचे साई किराणा स्टोअर्स असून दि.१७ च्या पहाटे ४.०० पुर्वी अज्ञात चोरटयाने बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या ७३ हजार ३०० रुपयांच्या चलनी नोटा चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच सचिन वाघमोडे यांचे अंबिका मेडिकल, प्रकाश कोळी यांचे रेणूका किराणा स्टोअर्स यांचेही बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेली आहे.
याच गावातील महमदचांद शेख, दावल तांबोळी यांचेही दुकानाचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे.दरम्यान,या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत यातील फिर्यादीत शिवगोंडा तळ्ळे यांच्या घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची ४० हजार रुपये किमतीची (एम.एच १३,डी.एफ ३५६६) ही मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.या चोरीचा तपास पोलिस नाईक संतोष चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, सध्या सुगी सराईचे दिवस चालू असल्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.एकाच दिवशी सिध्दापूरमध्ये अर्धा डझन चोऱ्या झाल्यामुळे व्यापारी व नागरिक भयभीत झाले आहेत.
पोलिसांना आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्यामधील मुद्देमाल हस्तगत करणे व चोरांना पकडणे यात यश न आल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याने चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवेढा शहरात ३५ लाख सोन्याच्या दागिन्याची तसेच चोरी झाली होती. ही चोरी केवळ सोलापूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघड करून आरोपीस जेरबंद केले.
स्थानिक पोलिसांना मात्र आत्तापर्यंत दाखल चोरीच्या गुन्हयातील आरोपीस पकडण्यास सध्या तरी यश प्राप्त झाले नाही.
कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनीच येथील स्थानिक पोलिसांना आपल्या कर्तव्यात लक्ष घालून त्यांना विशेष मार्गदर्शन करून भविष्यात होणाऱ्या चोऱ्या रोखाव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून पुढे येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज