टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे आताच सांगता येत नाही.
परिणामी पुढे काय वाढून ठेवले आहे. हे समजत नसल्याने सरपंचपद आपल्याच गटातील व्हावा म्हणून आघाडी आणि बिनविरोधच्या रचनेत आरक्षित जागांसाठी गावागावांत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
सरपंचपदाची सुप्त इच्छा मनात ठेवून गावपुढाऱ्यांनी आघाडीच्या रचनेत आरक्षित जागा आम्हालाच हवी असा हट्ट धरताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने अचानकपणे निवडणूक निकालानंतर सरपंच पदाची आरक्षणे जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
गावचे सरपंच पद म्हणजे मोठ्या सन्मानाचे मानले जाते.यामुळे या पदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी म्हणून अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसतात. परंतु, या निर्णयाने इच्छुकांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने गावागावांत आता निवडणुकीसाठी आघाडी आणि बिनविरोध निवडणूक करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत.सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार, याची खात्री देता येत नाही. खुल्या जागेवरील सरपंचपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती चालते.
परंतु, सरपंच आरक्षित झाल्यास तेथे त्याच प्रवर्गातील सदस्य लागतो. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ओबीसी, अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिला-पुरुषांसाठी आरक्षणे जाहीर होतात. प्रत्येक गट आपल्यालाच सरपंचपद मिळावे म्हणून आघाडी आणि बिनविरोधच्या रचनेत आरक्षित जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विशेष करून या जागांवरच आग्रह धरला जात आहे. त्या बदल्यात समोरच्या गटाला खुल्या जागा घेण्याची गळ घातली जात आहे. सरपंच पदाची सुप्त इच्छा मनात ठेवून गावपुढारी हा डाव खेळत असल्याचे चित्र आहे.
भविष्यात सरपंचपद आरक्षित झाल्यास हा डाव यशस्वी होण्याच्या शक्यतेने रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकंदरीत आघाडी किंवा बिनविरोधच्या रचनेत गावागावांत हा मुद्दा आता कळीचा ठरत आहे, एवढे मात्र निश्चित.
आरक्षित सरपंच अन् माघार
पूर्वीचे चित्र उलटे होते. निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण कळायचे. हे पद आरक्षित झाल्यास सरपंचसाठी निवडणूक लढविणारे चांगले व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले खुल्या गटातील इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे.
खुल्या जागांवर आग्रह धरत प्रभागातील आरक्षित जागाही एकमेकांवर लादण्याचे प्रकार होत असत. आता आरक्षणच अंधारात आहे. भविष्यात सरपंच पद आरक्षित झालेच, तर ते आपल्या पदरात पडावे म्हणून आरक्षित जागेसाठी पायघड्या घातल्या जात आहेत.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज