टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
पोलीस मराठा आक्रोश मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करतेय : खासदार नाईक-निंबाळकर
आज सोलापुरात होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही नेहमीप्रमाणे शांततेत मोर्चा काढणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रोश मोर्चात होणाऱ्या गर्दीबाबत विचारले असता खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात हजारोंची गर्दी चालते मग आमच्या का नाही? आम्हीही सॅनिटायझर, मास्कचा वापर करणार आहोत. सर्व नियम आणि अटींना आधीन राहून आम्ही मोर्चा काढणार आहोत. सदरचा मोर्चा हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आम्ही आत्ता हा मोर्चा काढत आहोत.
सोलापुरातील ठिणगीचा राज्यभर वनवा पसरणार : खासदार नाईक-निंबाळकर
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील पहिला मराठा आक्रोश मोर्चाची सुरुवात ही सोलापुरातून होत आहे. या सोलापुरात पडलेल्या ठिणगीचा वनवा राज्यभर पसरेल. त्यामुळे सरकारने तात्काळ या मोर्चाची दखल घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.(स्रोत:लोकमत)
मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरात एल्गार
मराठा आरक्षणासाठी पुन्हा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे. त्याअंतर्गत कोल्हापुरातून पहिले मोर्चाचे वादळ उठले.
आता दुसरा मोर्चा आज सोलापुरात आहे. यानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली असून आज सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातून सुमारे 25 ते 30 हजार मराठा मावळे सहभाग होणार असल्याचा अंदाज संयोजकांकडून व्यक्त केला आहे.
मराठा समाजाच्या या मोर्चाला पोलिस प्रशासनाने कोरोना व डेल्टा प्लसमुळे परवानगी नाकारली आहे. मोर्चा काढू नये, अशा नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत.
परंतु, हा मोर्चा काढून यशस्वी करणार असल्याचा निर्धार आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मोर्चाचे नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. तसेच आंदोलकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
हा मोर्चा भव्य आणि उग्र स्वरूपाचा निघणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हा मोर्चा बोलका असणार आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मोठा मोर्चा आज निघणार आहे.
या मोर्चामध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, गटनेते आदी राजकीय नेते सहभागी होणार आहे. याबरोबर युवक, महिला, वयोवृध्द, लहान मुलांचा सहभाग असणार आहे. या मोर्चाला माकप, लोहार समाज, तौफिक शेख, यांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्चाची सुरूवात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे.
त्यानंतर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पोलिस आणि मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यामध्ये धरपकड होण्याची शक्यता आहे.
एकीकडे कोरोना असून कलम 144 लागू आहे. विशेषतः ग्रामीण भागातून मराठा समाज मोठ्या संख्येने येणार आहे.संयोजकांकडून देखील हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
ऐनवेळी मोर्चाच्या सभेचे ठिकाण बदलले
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. परंतु, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे आयोजकांनी पोलिस दडपशाही करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पूनम गेट येथे होणार्या मोर्चा सभेचे पूर्वनियोजित ठिकाण ऐनवेळी शनिवारी रात्री बदलण्यात आले. आता या मोर्चाची सभा पार्क चौक येथील चार पुतळा येथे होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज