मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शेतीवाडीतील घाम, संघर्षाची शिदोरी आणि प्रामाणिक कष्ट यांच्या बळावर उभे राहिलेले सहकाराचे साम्राज्य म्हणजे मा. श्री. महादेव बिराजदार गुरुजी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय.

सिद्धापूरच्या मातीत रुजलेली ही सहकाराची चळवळ आज महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांत विश्वासाची पताका फडकवत असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यापक सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे हे नेतृत्व आज अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात यश हे संपत्ती, पदे व आकड्यांमध्ये मोजले जाते. मात्र कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असतानाही मा. श्री. महादेव बिराजदार गुरुजी यांच्या स्वभावात अहंकाराचा लवलेशही दिसून येत नाही.

अत्यंत नम्र, शांत, संयमी आणि माणुसकीने परिपूर्ण असा त्यांचा स्वभाव हीच त्यांची खरी ओळख आहे. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्तीशी समान सन्मान, आदर आणि आपुलकीने संवाद साधणे हेच त्यांचे जीवनमूल्य आहे.

परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल, तर यश नक्की मिळते—हे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनप्रवासातून ठामपणे सिद्ध करून दाखवले आहे.

संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व
सामान्य ग्रामीण कुटुंबात जन्मलेल्या महादेव बिराजदार गुरुजींनी बालपणापासूनच शेतीची कामे, घरच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणी जवळून अनुभवल्या. दुष्काळ, मर्यादित साधनसामग्री आणि ग्रामीण जीवनातील वास्तव त्यांनी लहान वयातच पाहिले.

शेती करताना गाळलेला घाम आणि शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्ट यांमधूनच “कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही” हा जीवनमंत्र त्यांनी आत्मसात केला. संघर्षातून उगवलेली आशा आणि कष्टातून साकारलेली स्वप्ने याच पायावर त्यांच्या जीवनाची जडणघडण झाली.
ज्ञानातून समाजसेवेचा प्रवास
अनेक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणामुळेच आयुष्याला योग्य दिशा मिळते, हा त्यांचा ठाम विश्वास होता. याच विश्वासातून त्यांनी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सेवा बजावली.
शिक्षक म्हणून त्यांनी केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि सामाजिक भान रुजवले. आज विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या अनेक व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे

सुरक्षित नोकरीचा त्याग : समाजहितासाठी धाडसी निर्णय
शासकीय नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थैर्य. मात्र ग्रामीण महिलांची आर्थिक कुचंबणा, तरुणांची बेरोजगारी आणि छोट्या उद्योजकांच्या अडचणी पाहून गुरुजी अस्वस्थ झाले.
समाजासाठी काहीतरी मोठे करण्याच्या ध्यासातून त्यांनी शिक्षकी पेशाला राजीनामा देत सहकार क्षेत्रात प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता; मात्र समाजहिताची दूरदृष्टी, ध्येयवाद आणि अपार चिकाटी याच निर्णयामागील खरी प्रेरणा ठरली.

सिद्धापूरच्या मातीत रुजलेले सहकाराचे बीज
सन २००६ मध्ये सिद्धापूर गावातून सुरू झालेली *लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सिद्धापूर (मर्या.), जिल्हा सोलापूर* ही ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा भक्कम आधारस्तंभ ठरली आहे. सुरुवातीच्या काळात भांडवलाची कमतरता, विश्वासाचा प्रश्न आणि प्रशासकीय अडचणी असूनही पारदर्शक व्यवहार, प्रामाणिक कारभार आणि सभासदांचा विश्वास या तीन स्तंभांवर संस्थेची भक्कम उभारणी झाली.
आज संस्थेच्या एकूण ठेवी ₹ ६२,५२,९१,२८०/- (रुपये बासष्ट कोटी बावन्न लाख एक्याण्णव हजार दोनशे ऐंशी) असून एकूण कर्जवितरण ₹ ४३,३२,५०,५०५/- (रुपये त्रेचाळीस कोटी बत्तीस लाख पन्नास हजार पाचशे पाच)
इतके आहेत, तसेच संस्थेचा एकूण निधी ₹ २,१२,१५,३०४/- (रुपये दोन कोटी बारा लाख पंधरा हजार तीनशे चार)
आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय सिद्धापूर येथे असून ५ शाखा व १ मुख्यालय आहेत. संस्थेमध्ये एकूण २७ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना बचत, कर्जपुरवठा, स्वयंरोजगार, लघुउद्योग व शेतीपूरक व्यवसायांसाठी दिले जाणारे अर्थसहाय्य त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देत आहे.
महाराष्ट्र ते कर्नाटक : सुवर्णरत्न मल्टीस्टेटचा विश्वासार्ह विस्तार
सहकाराचा हा विश्वास अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने सन २०१२ मध्ये *सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सिद्धापूर* या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत विश्वासार्ह सहकारी संस्था म्हणून स्वतःची ठाम ओळख निर्माण करत आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय सिद्धापूर येथे असून ८ शाखा व १ मुख्यालय कार्यरत आहे. संस्थेमध्ये ७० हून अधिक कर्मचारी व दैनंदिन वसुलीसाठी ३ एजंट कार्यरत आहेत. संस्थेशी ४,२१२ भागधारक सभासद जोडले गेले असून ६,८३४ कर्जदार सभासद संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार करत आहेत. आजवर १४,८०५ सभासदांना कर्जसेवा देण्यात आलेली आहे.
संस्थेचे एकूण कर्जवितरण ₹ ९८,५०,१३,०३१/- (रुपये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख तेरा हजार एकतीस) असून एकूण ठेवी ₹ १,६५,८४,७३,५०२/- (रुपये एकशे पासष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार पाचशे दोन) आणि एकूण निधी ₹ ४,२५,६४,२५१.६०/- (रुपये चार कोटी पंचवीस लाख चौसष्ट हजार दोनशे एकावन्न रुपये साठ पैसे)
इतका आहे.
श्री मल्लिकार्जुन अर्बन व मंगल कार्यालय : विकासाचा सेतू
सन २०२३ पासून कार्यरत असलेली *श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मंगळवेढा* ही शहरी व निमशहरी भागातील नागरिकांसाठी आर्थिक स्थैर्याचा विश्वासार्ह आधार ठरत आहे. संस्थेचे १,१४५ सभासद असून ठेवी ₹ ९,२५,०१,६६५/- (रुपये नऊ कोटी पंचवीस लाख एक हजार सहाशे पासष्ट) आणि कर्जवितरण ₹ ७,०९,३४,७१२/- (रुपये सात कोटी नऊ लाख चौतीस हजार सातशे बारा) इतके आहे.
सन २०१५ मध्ये उभारण्यात आलेले *श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालय, सिद्धापूर* हे भव्य-दिव्य, आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे मंगल कार्यालय असून विवाह समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांसाठी परिसरातील आदर्श केंद्र ठरत आहे.
रोजगारनिर्मिती व सामाजिक बांधिलकी
या सर्व संस्थांच्या माध्यमातून थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात अनेक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण तरुणांना शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या परिसरातच रोजगार मिळू लागला आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, महिला बचत गटांना सहाय्य आणि विविध ग्रामविकास उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी सातत्याने जपली जात आहे.
सदिच्छा भेट व गौरवाचा क्षण
अलीकडे लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सिद्धापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी मा. श्री. महादेव बिराजदार गुरुजी यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि सहकार चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले.
नम्रतेचा मुकुट घालून यशस्वी झालेले नेतृत्व
कोट्यवधींची आर्थिक उंची गाठूनही अत्यंत नम्र, संयमी आणि माणुसकीने भरलेला स्वभाव हीच गुरुजींची खरी ओळख आहे. सहकाराच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवणारे, माणुसकी जपणारे आणि नम्रतेने यश स्वीकारणारे नेतृत्व म्हणजे मा. श्री. महादेव बिराजदार गुरुजी. त्यांची ही वाटचाल पुढील अनेक पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
ग्रामीण विकासाचा हा दीपस्तंभ अधिक उजळत राहो आणि समाजासाठीची त्यांची धडपड अशीच अखंड सुरू राहो, अशा शब्दांत सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
लाख–लाख शुभेच्छा..!
*ग्रामीण विकासाचा हा दीपस्तंभ अधिक उजळत राहो,*
*समाजासाठीची त्यांची धडपड अशीच अखंड सुरू राहो,*
*यासाठी गुरुजींना पुढील कार्यासाठी*
*लाख–लाख हार्दिक शुभेच्छा..!*
✍️ *श्री. सिद्धाराम कुंभार*
*नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल,*
*एम.आय.डी.सी., सोलापूर*



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













