मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची महत्वपूर्ण माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ जण म्हणजे पक्ष नव्हे. त्यामुळे या नऊ जणांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षविरोधात कारवाई केल्याने या नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पक्षाच्या अध्यक्षाला न सांगता केलेली ही कृती होती. यासंबंधित आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. या 9 जणांच्या विरोधातच ही कारवाई असेल. पक्षात असून त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “जनमत हे पवार साहेबांच्या सोबत आहे. येत्या 5 जुलै रोजी पाहा, पवारा साहेबांच्या पाठिमागे महाराष्ट्र कसा उभा राहतो ते. यातील अनेक आमदार हे परत येणार आहेत.
त्यांना आपल्या मतदारांना तोंड कसं दाखवायचं असा प्रश्न पडला आहे. त्यांना या गोष्टीही माहिती नव्हत्या. जे परत येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”
जितेंद्र आव्हाडांचा व्हिप सर्वांना लागू
जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन सांगितलं की, पक्षाने ठरवलेला व्हिप हा अंतिम असतो, आणि जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादीचे व्हिप असतील. मी त्यांना जो आदेश देईन आणि ते जे सांगतील ते सर्व आमदारांना लागू होईल.
ज्या वेळी या नऊ जणांनी शपथ घेतली त्याच वेळी ते अपात्र ठरले असून यासंबंधित पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, महाराष्ट्रात या आधी असं कधीही झालं नव्हतं. या आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीवर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज