टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्व.सौ.अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी शाहू शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवेढ्यातील नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त व सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शिबिर
मंगळवेढा येथील शिशुविहार येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शिबिर होणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये मेंदू व मणक्याचे आजार, सांधेदुखी, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग, वंध्यत्व, कॅन्सर, त्वचारोग, हृदयरोग, मूत्रविकार तसेच डोळे, कान, नाक, घसा यासंबंधीचे आजाराची तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
निदान केल्यानंतर त्यावर उपचारदेखील करण्यात येणार
तसेच आजाराचे निदान केल्यानंतर त्यावर उपचारदेखील करण्यात येणार आहेत. हे शिबिर सर्वांसाठी मोफत आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आरोग्याबद्दल फारसे जागरुक नसतात. विशेषत: यामध्ये महिलांचे मोठे प्रमाण दिसून येते.
बिकट आर्थिकस्थिती, आजाराबद्दलचे अज्ञान, अंधश्रद्धा, खर्चिक उपचारपद्धती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा विविध कारणांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आजार अंगावर काढतात.
गरीब, गरजू रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न
यातूनच पुढे आजार बळावण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागृती व्हावी, तसेच या मोफत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मंगळवेढ्यातील गरीब, गरजू रुग्णांना चांगले उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या शिबिरात विविध शासकीय योजना, आरोग्य विमा याबद्दलची माहितीदेखील देण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबिराला नामवंत डॉक्टरांकडून तपासणी
या महाआरोग्य शिबिराला सोलापूर जिल्हा शल्यचिकित्क डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पद्माकर अहिरे, वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलोचना जानकर कोडलकर तसेच बालरोग तज्ज डॉ. शितल शहा, मेंदू व मणका तज्ज्ञ डॉ. शुभदा खंदारे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत निकम,
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. बकुळ जहागीरदार, नेत्रतज्ज्ञ डॉ. ए. एस. हरणमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील 25 तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
मंगळवेढ्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले सूतगिरणीचे संचालक अभिजित ढोबळे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सावली फाउंडेशनचे सर्व संचालक, सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज