टीम मंगळवेढा टाईम्स ।
यंदाची ही आषाढी यात्रा शासन निर्णयानुसार प्रतीकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. असे असले तरीही अनेक भाविक आतापासूनच पंढरपूरकडे येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या भाविकांना यात्रेपूर्वी परत पाठविले जाईल.
याचबरोबर दि.१७ ते २५ जुलै दरम्यान पंढरपूर सह आसपासच्या गावांमध्ये कडक संचारबंदीची अंमलबजावणी होईल , अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी येथे दिली.
आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी येथे पाहणी करून आढावा घेतला. यादरम्यान श्री विठ्ठल मंदिरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे अगोदरच पंढरपुरातील व्यापारी आणि सर्व घटकांचे मोठे नुकसान झाले आहे. आषाढी यात्रा कालावधीत दि.१७ ते २५ जुलै या दरम्यान संचारबंदी लागू होणार असल्याने नुकसानीत आणखी भर पडणार आहे.
हे टाळण्यासाठी दशमीपासून केवळ ३ दिवस संचारबंदी करावी अशी मागणी आ. प्रशांत परिचारक व आ.समाधान अवताडे यांनी शासनाकडे केली आहे.
गुरुवारी स्थानिक व्यापाऱ्यांनीही याबाबत लेखी निवेदन प्रशासनाला दिले. याविषयी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते म्हणाल्या, यावर्षी मानाच्या दहा पालखी सोहळ्यांना मोजक्या वारकऱ्यांसमवेत वाखरी पासून पंढरपूरपर्यंत पायी वारीस परवानगी देण्यात आली आहे.
दि.१९ जुलै पासून पालखी सोहळे दाखल होण्यास सुरुवात होईल. तत्पूर्वी येथे वारकऱ्यांची गर्दी होऊ नये या दृष्टीने दि.१७ जुलैपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दि.१७ जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू राहतील. त्यानंतर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू होईल. संचारबंदीचा कालावधी कमी करण्याची मागणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिळयांसमवेत आम्ही चर्चा केली.
यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने विविध भागातून वारकरी आतापासूनच पंढरपुरात येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या अनुषंगाने संचारबंदीचा कालावधी कमी करणे उचित नाही.
तसेच जिल्हा, तालुका आणि शहर अशा त्रिस्तरीय नाकाबंदीद्वारे भाविकांना येथे येण्यापासून रोखण्यात येणार आहे. भाविकांनीही यात्रेसाठी येथे न येता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही सातपुते यांनी केले.
मठांची तपासणी करणार
सध्या विविध भागातून वारकरी पंढरपूरकडे येत असल्याचे दिसत आहेत. हे वारकरी येथील विविध मठ , धर्मशाळांमध्ये मुक्कामी थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी सर्व मठ, धर्मशाळा यांची तपासणी करून संबंधित वारकऱ्यांना त्यांच्या गावी परत पाठविले जाईल. मठांमध्ये बाहेरचे कोणीही वारकरी ठेऊन घेऊ नयेत , अशा सूचना संबंधितांना दिल्या जातील , असेही सातपुते यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज