टीम मंगळवेढा टाईम्स।
आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला. विनापेन्शन. त्यामुळे जमले तर निवृत्त व्हा, अशा पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करत जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, ‘, असे आवाहन सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी केले आहे.
बेनामी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल करताना आज शुक्रवार, दि.१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आवाहनही केले.
यामुळे चेहरा नसलेल्या या जमावाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, मोर्चाचे स्वरूप, कुठून सुरुवात होणार आहे, कोण नेतृत्व करणार आहे, याबाबत अद्यापही मागमस लागलेला नाही.
शासकीय कर्मचाऱ्यांनी ऐन मार्च अखेरीस बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने जनजीवन पुरते स्तब्ध झाले आहे. नागरिकांची शासकीय कार्यालयांतील कामे खोळंबली असून, समाजातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
शाळा-महाविद्यालये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत, तहसील, इतकेच काय, गावातील चावडीही बंद असल्याने संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नोकरशाहीच्या या बेमुदत संपाच्या निर्णयाविरोधात चिडलेल्या युवावर्गाने थेट जिल्हधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आवाहन केल्याने सोशल मीडियासह गावागावातील चौक, पारांवर चर्चा , रंगली आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
यायला लागतंय :
जुनी पेन्शन योजना राज्याला आर्थिक संकटात टाकणारी आहे. एकीकडे आमच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे शासकीय नोकरी असून, त्यांना पेन्शनची चिंता लागून राहिली आहे.
आम्हाला घर, कुटुंब, भवितव्य आहे की नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करतानाच मी येतोय … तुम्ही पण या… यायला लागतंय, असे परवलीचे आवाहन बेनामी चेहऱ्याने समाजमाध्यमावर केले आहे.
जुनी पेन्शन सुरू न करण्याची मागणी
जुनी पेन्शन सुरू केल्यास राज्य दिवाळखोरीत जाईल. जगात इतर कुठल्याच देशात जुनी पेन्शन योजना अस्तित्वात नाही. सध्या राज्याच्या उत्पन्नातील ५६ टक्के रक्कम पगारावर खर्च होते. ही योजना ८४ टक्के रक्कम निवृत्ती वेतनावर खर्च होईल. यामुळे विकासकामांसाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी, शेतकरी, विद्यार्थी कल्याणासाठी निधीच शिल्लक राहणार नाही.
आरोग्य, शिक्षण हे मूलभूत विभाग वंचित राहतील. नोकर भरती होणार नाही. त्यामुळे पेन्शन सुरू करू नये, अशी आमची प्रमुख मागणी आहे. ती सुरू करायची असेल तर शेतकरी, जवानांना सुरू करा, अशीही प्रमुख मागणी या बेनामी संदेशात केली आहे.
‘पेन्शन फायटर’चा सवाल : ‘जुनी पेन्शन’ लागू होईपर्यंत लढा सुरूच राहणार; आम्ही हक्क मागितला तर चुकलं कुठं?
म्हातारपणाची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना आम्हाला हवी आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी होत असलेल्या संपाबद्दल समाज माध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आम्ही शासनाकडे पेन्शन मागणारे सारेजण आपलेच बांधव असल्याने समाजातील प्रत्येक व्यक्तीने या संपाला पाठिंबा द्यावा. हा पेन्शन लढा जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत सुरूच राहणार, असा निर्धार मंगळवेढा तालुक्यातील पेन्शन फायटरनी व्यक्त केला.
जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात एकत्र येत जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली व शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला.
मंगळवेढा येथे गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या आंदोलनात आज अनेक संघटनांनी प्रतिसाद देत तालुक्यातील अनेक संस्था व व्यक्ती समूहांनी या पेन्शन लढ्यात सहभाग घेतला.
तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी होत असलेल्या आज संपाला इतर व्यक्ती, संघटनांनी पाठिंबा द्यावा, यासाठी मंगळवेढा येथील पेन्शन फायटरने समाजातील व्यक्तिसमूह, संस्था पदाधिकारी, शाळा कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून पेन्शन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सहभाग नोंदवत आंदोलनाची ताकद वाढवली. आंदोलनाच्या सुरवातीस तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका विशद केली. या आंदोलनानंतर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकच ‘मिशन- जुनी पेन्शन’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’
अशा अनेक घोषणा देत दामाजी चौक ते नगरपालिका या मुख्य रस्त्यावरून पायी रॅली काढली. या रॅलीचा समारोप नगरपालिका अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शनची मागणी करणारे निवेदन देऊन करण्यात आला. गेल्या दोन दिवसात प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांना निवेदने देण्यात आली आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज