टीम मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।
दुधाची पावडर, हलक्या दर्जाचे पामतेल आणि केमिकलचे मिश्रण वापरलेल्या भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील चेंबूर भागात घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने चेंबूर येथील दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या डेअरी पंजाब या दुकानावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल युनिटने चेंबूर, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबईत कारवाई केली.
डेअरी पाठोपाठ कारखान्यांवर छापेमारी करत दोन हजार किलो वजनाचा पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आरोग्यास अपायकारक असलेल्या या पनीरचा रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांना पुरवठा होत असल्याचा दावा केला जात आहे.
डेअरी पंजाब या दुकानात भेसळयुक्त पनीर असल्याची माहिती पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिली होती. या कारवाईत डेअरी पंजाब तसेच या दुकानात पनीरचा पुरवठा करणाऱ्या दोन विक्रेत्या दुकानदारांवरही अन्न आणि औषध प्रशानाने कारवाई केली आहे.
तिघांना किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपयां पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. दैनिक सामनाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
डेअरी पंजाबमधून किमान 19 किलोचे पनीर अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केले. यावेळी दुकानासमोर भिवंडी आणि बदलापूरहून पनीरचा पुरवठा करणारे दोन वाहनेही उभी होती.
दोन्ही वाहनांतून प्रत्येकी 270 किलो आणि 185 किलो पनीर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले. तिन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या पनीरपैकी काही पनीरचे नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पामतेल, दूध पावडरीचाही साठा जप्त
प्रयोगशाळा अहवालातून पनीरचा दर्जा मानांकनानुसार नसल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने डेअरी पंजाब तसेच भिवंडीतील दिशा डेअरी आणि बदलापूर येथील यशोदा ऑर्गेनिक्स या दोघांविरोधातही चेंबूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
बदलापूर, भिवंडी, नवी मुंबईतील छापेमारीत पामतेलाचे भरलेले 95 डबे, 30 पोती दूध पावडर आणि 1500 किलो पनीर सापडले आहे.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज