मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना ‘सिबिल स्कोअर’ची अट घालू नये, असे आदेश राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने (एसएलबीसी) सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांना दिले आहेत.
‘सिबिल’ स्कोअर कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असेही ‘एसएलबीसी’ने स्पष्ट केले आहे. पण, तो शेतकरी कोठेही थकबाकीदार नसल्याची पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
भाजप-शिवसेना व महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. अनेक थकबाकीदारांनी तडजोड करून कर्ज भरले.
काहीवेळा फायनान्स कंपन्या किंवा पतसंस्था, नागरी बॅंकांकडील वाहन, गृहकर्ज थकबाकीत गेले आणि उशिराने फेडल्याने देखील ‘सिबिल’ स्कोअर कमी झालेला असतो.
त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बॅंकांच्या ‘सिबिल’ सक्तीमुळे कर्ज मिळू शकत नव्हते. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनीही त्यासंबंधीचे पत्र ‘एसएलबीसी’ला पाठवले होते. तरीपण, काही बॅंका पीक कर्ज देताना ‘सिबिल’ची सक्ती करीत होते.
या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सिबिल’ स्कोअरची सक्ती करणाऱ्या बॅंकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ‘एसलबीसी’ने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे मार्गदर्शन मागविले होते.
त्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपावेळी ‘सिबिल स्कोअर’ कमी असल्याचे कारण सांगून कोणत्याही बॅंकांनी अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना ‘एसएलबीसी’कडून देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील ६४ लाख ७० हजार शेतकऱ्यांना विविध बॅंकांच्या माध्यमातून ७० हजार कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना जवळपास ३० हजार कोटींचे टार्गेट असणार आहे.
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माध्यमातून बॅंकांना आता तेवढे उद्दिष्ट दिले जाणार आहे. १०० टक्के कर्जवाटप व्हावे, यादृष्टिनेदेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर शून्य किंवा मायनस एक आहे, अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी तातडीने कर्ज द्यावे. त्या शेतकऱ्यांना आजवर कोणाकडूनही कर्ज घेतले नसल्याने त्यांना कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसेल.
पण, ज्या मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी तडजोडीतून ‘ओटीएस’द्वारे (एकरकमी कर्जाची परतफेड) कर्जाची परतफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना कर्ज देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊनच कर्ज द्यावे, अशाही सूचना ‘एसएलबीसी’ने केल्या आहेत.
कर्ज देण्यापूर्वी संबंधित कर्जदाराचा ड्यू-डिलिजन्स (यथायोग्य कार्यशक्ती) पडताळणी करून कर्जवाटप करावे, असेही स्पष्ट केले आहे.(स्रोत;सकाळ)
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती बॅंकांनी करू नये
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बॅंकांनी सिबिल स्कोअरची सक्ती करू नये, अशा ‘एसएलबीसी’कडून सर्वांना सूचना प्राप्त झाल्या आहेत. पण, संबंधित कर्ज मागणारा व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अशी अट आहे.- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज