मंगळवेढा टाईम्स टीम । संत दामाजी साखर कारखान्या संदर्भात प्रसिध्द झालेल्या विविध वर्तमानपत्रातील साखर विक्रीबाबत आलेल्या बातमीमुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक यांची दिशाभूल होवू नये यासाठी खुलासा करीत असल्याची माहिती कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.
शेतक-यांचे ऊसबील व कामगार पगार अदा करण्यासाठी केली साखर विक्री
कारखान्याचे गळीत हंगाम २०१७-१८ व २०१८-१९ मधील उत्पादीत साखरे पैकी ९०६७० क्विंटल साखर विक्री केलेली आहे. सदर साखर विक्री करुन आलेल्या रकमेचा विनियोग गाळप हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांच्या ऊसबिलाची रक्कम अदा करणेसाठी वापरली आहे.
ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे पूर्ण तोडणी वाहतुक बिले, कामगारांचे पगार दिले
तसेच कोवीड १९ च्या प्रादुर्भावाने कारखान्याच्या कामकाजात वेळोवेळी अडचणी निर्माण झालेल्या असतानाही गळीत हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मधील ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे पूर्ण तोडणी वाहतुक बिले, कामगारांचे पगार, फंड, जीएसटी रक्कम, मशिनरी दुरुस्ती व निगा तसेच शासकीय देणी अदा केलेली आहेत.
बँकेत अल्पमुदत कर्ज व मालतारण कर्जापोटी भरणा
वरील साखर विकून आलेल्या रकमेपैकी जास्तीची रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अल्पमुदत कर्ज व मालतारण कर्जापोटी भरणा केलेली आहे.कारखान्याने आजमितीस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मालतारणावर घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासह पूर्णपणे परतफेड केलेली आहे.
कारखान्याच्या आजुबाजूला असणा-या सहकारी साखर कारखान्याचे मागील दोन किंवा तीन हंगामातील ऊसाची बीले, कामगारांचे पगार, तोडणी वाहतुक बीले अद्यापही थकीत आहेत.
याबाबत आंदोलनेही होताना आपणाला दिसत आहेत. याबाबत आपणा सर्वांना ज्ञातच आहे. अशा परिस्थितीही संत दामाजी कारखान्याने गळीत हंगाम २०१८-१९ व २०१९-२० मधील ऊस गाळपास आलेल्या ऊसाची संपूर्ण एफआरपीची रक्कम, ऊस तोडणी वाहतुक बीले, कामगारांचे पगार अदा केलेले आहेत.
उर्वरीत देय रक्कम लवकरात लवकर मिळणार
गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाच्या बिलाच्या एफआरपीच्या रकमेपैकी ७२% रक्कम अदा केलेली असून उर्वरीत देय रक्कम लवकरात लवकर अदा करीत आहोत.
गळीत हंगाम २०२०-२१ मधील ऊस तोडणी वाहतुकीची पूर्ण रक्कम अदा केलेली आहे
तसेच उर्वरीत फंड, कामगार पगार, ऊस तोडणी वाहतुक कमिशन लवकरच अदा करीत आहोत.
सभासदांना दहा रुपयांना साखर देणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा सोलापूर जिल्हयामध्ये कारखाना सभासदांना प्रति किलो १०/- रुपये प्रमाणे दिवाळी सणासाठी ३० किलो व गुडीपाडवा सणासाठी ३० किलो अशी एकुण ६० किलो साखर देणारा एकमेव कारखाना आहे.
कोवीड १९ च्या प्रादुर्भावामुळे गुडीपाडवा साखर वाटपास थोडा उशीर झाला त्यावेळी सुध्दा सभासदांना साखर मिळणार नाही अशा अफवा उठल्या होत्या. परंतु सभासदांच्या सोईच्यादृष्टीने विविध ठिकाणी साखर वाटप पूर्ण केलेले आहे.
कारखान्यावर २०० कोटीचे कर्ज असलेली बातमी निराधार व खोटी
सध्या कारखान्यावर २०० कोटीचे कर्ज असलेली बातमी निराधार व खोटी आहे. हे कारखाना सभासदांना माहित असावे म्हणून खुलासा करीत आहे.
तक्रारदारा पैकी एकही व्यक्ती कारखान्याची सभासद नाही
प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांचेकडे अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जणांनी जो तक्रारी अर्ज दिलेला आहे तो चुकीच्या पध्दतीने दिलेला आहे. सदर २२ तक्रारदार व्यक्ती पैकी एकही व्यक्ती कारखान्याची सभासद नाही याचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो.
कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने सुरू
कारखान्याचे चेअरमन तथा आमदार समाधान महादेव आवताडे व संचालक मंडळ यांनी आजपर्यंत कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने चालविलेचे आपणास ज्ञात आहे.
गळीत हंगाम २०२१-२२ साठी ६ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ठ
गळीत हंगाम २०२१-२२ साठी मशिनरी दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऊस तोडणी बैलगाडी ठेकेदार यांचे करार पूर्ण झालेले आहेत. यावर्षी ऊस पिक परिस्थिती अत्यंत चांगली असल्यामुळे संचालक मंडळाने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ६ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ठ ठेवलेले आहे.
नेहमीप्रमाणे ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी संत दामाजी कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी संचालक यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज