टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयाचा पाणीसाठा आजअखेर 104.35 टक्के (119.57 टीएमसी) असल्याने उन्हाळ्यात पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे उजनी लाभ क्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे.पुणे जिल्हा व परिसरात गतवर्षी झालेल्या पावसाच्या बळावर उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले व पावसाळ्यामध्ये जलाशयात अतिरिक्त पाणीसाठा खाली सोडण्यात आला होता.
दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तरी नेहमीप्रमाणे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी न झाल्याने उजनी जलाशयाच्या वरील बहुतांश पाणथळ जागा अद्यापही पाण्यातच आहेत.
जलाशयात पाण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने पाणथळ जागा अल्प प्रमाणात रिकाम्या झाल्या आहेत. दलदल कमी प्रमाणात आहे. त्यामुळे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या या वेळी पाणीसाठा भरपूर असूनही कमी प्रमाणात दिसून येत आहे.
त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट अद्याप वाढला नसला तरी, आगामी काळात पाणथळ जागा रिकाम्या झाल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उजनी जलाशयात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असला तरी दिवसभर पाण्यामध्ये राहूनही पाहिजे त्या प्रमाणात मच्छीमारांना मासे सापडत नाहीत. कारण, जलाशयाच्या काठी माशांना लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीच्या जागा उपलब्ध आहेत.
मासे अडचणीत राहणे पसंत करतात. या जागा अद्याप रिकाम्या झालेल्या नाहीत. त्या अद्यापही पाण्याखालीच आहेत. या जागा जलाशयाचे पाणी कमी झाल्यानंतर मोकळ्या झाल्यानंतर मासे मोठ्या प्रमाणावर सापडतील, असे मच्छीमार सांगत आहेत.(सकाळ)
उजनीची आजची स्थिती
एकूण पाणीसाठा : 3328.28 (दलघमी)
एकूण पाणी पातळी : 497. 25 (मीटर)
उपयुक्त पाणीसाठा : 1517.30 (दलघमी)
आजचा पाणीसाठा : 119.57 (टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा : 104.35 (टक्के)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज