सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज आणखी आठ जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात मात्र मृत्यूचे भय कायम आहे. तर आज कोरोनाबाधितांची संख्या केवळ 154 एवढी आढळून आली आहे. 312 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 544 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 390 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 154 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता 28 हजार 255 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 779 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाग्रस्त झाल्याने वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये 4 हजार 351 उपचार घेत आहेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 20 हजार 125 जण कोरोनामुक्त झाल्याने आपापल्या घरी परतले आहेत.
आज ‘या’ भागातील आठ जणांचा मृत्यू
मंगळवेढा शहरातील सणगर गल्ली येथील 56 वर्षाची महिला, उचेठाण (ता. मंगळवेढा) येथील 30 वर्षाचे पुरुष,उजनी (ता. माढा) येथील 50 वर्षाचे पुरुष, खवणी (ता. मोहोळ) येथील 70 वर्षाचे पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 70 वर्षाचे पुरुष, बलवडी (ता. सांगोला) येथील 67 वर्षाची महिला, कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील 70 वर्षाचे पुरुष तर घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात आज 35 पॉझिटिव्ह
सोलापूर शहरातील 336 पुरुष आणि 171 महिलांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण 60 वर्षांवरील तथा को- मॉर्बिडच आहेत. कोरोनापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून राज्य सरकार व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात असतानाही मृत्यू पूर्णपणे कमी झालेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी साबळे नागरी आरोग्य केंद्रातील गैरप्रकार समोर आला. तर जिजामाता आरोग्य केंद्रातही असेच प्रकार सुरु असल्याचे काही शिक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे अशा गंभीर प्रकाराबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात आज रेल्वे लाईन्स, रेसिडेन्सी क्वार्टर, महोदव नगर, मुकुंदराय आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी, सुनिल नगर, राघवेंद्र नगर, पश्चिम मंगळवार पेठ, विजापूर नाका, अंत्रोळीकर नगर, मंत्री चंडक रेसिडेन्सी, दावत चौक, आशियाना नगर (जुळे सोलापूर), जमादार टॉवर (मुरारजी पेठ), मुळे बिल्डींग (नवी पेठ), राधाकृष्ण कॉलनी (वसंत विहार रोड), अविनाश रेसिडेन्सी, मल्लिकार्जुन नगर (हत्तुरे वस्ती), कोंडा नगर, वज्रेश्वरी नगर (अक्कलकोट रोड), कर्णिक नगर, बसवेश्वर नगर, नंदीकेश सोसायटी, धर्मराज नगर, कामाक्षी नगर, सिध्दमोग नगर, (शेळगी), शुक्रवार पेठ आणि माशाळ वस्ती, उत्कर्ष नगर (विजयपूर रोड) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक को- मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संपूर्ण राज्यभर ‘कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे.
सोलापूर शहरात सुमारे 40 हजार ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहिती यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व्हेवेळी अशा व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल, तापमानाची नोंद वारंवार घेऊन तब्बेतीची विचारपूस केली जाते.
अनेक कुटुंबातील व्यक्ती सहकार्य करीत नाहीत, ही वस्तुस्थिती सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर कथन केली. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांकडून त्यांना अंदाजे तापमान व ऑक्सिजन लेव्हल नोंदविण्याचा सल्ला दिला जातोय.
यापूर्वीही तीनवेळा सर्व्हे झाला असतानाही शहरात पुन्हा 60 वर्षांवरील व्यक्तींचाच कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आज सुशिल नगर (विजयपूर रोड) येथील 60 वर्षीय महिला, आरटीओ कार्यालयाजवळील 78 वर्षीय पुरुष, माधव नगरातील 65 वर्षीय महिला आणि रोहिणी नगर भाग तीनमधील 85 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज