मंगळवेढा टाईम्स न्युज नेट्वर्किंग ।
बोगस कंपन्यांची खरेदी-विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे १०० कोटी रुपयांची वस्तू व सेवा विक्री कर (जीएसटी) चोरी करणारा आरोपी साजिद अहमद शेख (वय ४६, रा. सोलापूर) याला केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने काल गुरुवारी अटक केली.
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गेल्या चार वर्षापासून त्याने कर चोरी करून शासनाला गंडा घातल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली.
कॉम्प्युटर मोबाईल कागदपत्रे जप्त
गुप्तचर अधिकाऱ्यांनी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयात छापा टाकून कॉम्प्युटर, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
यात बोगस कंपन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. यावरून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील साजिद शेख याने ३० बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या.
त्याद्वारे तो सिमेंट आणि सळई खरेदी-विक्रीचे कागदोपत्री व्यवहार दाखवत होता. त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ घेत होता.
प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय येताच केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी शेख याच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला होता.
एकाच दिवशी त्याच्या १२ कंपन्यांची चौकशी केली. त्यात सुमारे ५० कोटीपर्यंत कर चोरी केल्याचे स्पष्ट झाले. इतर १८ कंपन्यांसह कर चोरीची रक्कम शंभर कोटींच्या वर पोहोचेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
शासनाची दिशाभूल करून कर चोरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी शेख याला नोटीस पाठवून कोल्हापुरात बोलावले होते. कोल्हापुरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात त्याला गुरुवारी अटक केली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज