टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आरोपींनी मैदानी चाचणी परीक्षेत आपापल्या चेस्ट क्रमांकाची अदलाबदल करून मैदानी चाचणी परीक्षा दिली,
तसेच गुणतक्त्त्यावर बदललेल्या चेस्ट नंबरच्या उमेदवाराची बनावट सही करून शासनाची फसवणूक करून, शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळविण्यासाठी गुन्हा करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
भीमाशंकर नारायण पवार, सोमनाथ हरिदास पवार, नागेश गोविंद वाघमारे, अशी शिक्षा सुनावलेल्या तिघांची नावे आहेत.
१२ मार्च २०१८ रोजी पोलिस मुख्यालय सोलापूर ग्रामीण याठिकाणी पोलिस भरती प्रक्रियेच्या वेळी चेस्ट क्र. ५६४ नागेश गोविंद वाघमारे व चेस्ट क्र. ५६५ भीमाशंकर नारायण पवार या दोघांनी आपापल्या चेस्ट क्रमांकांची अदलाबदल करून १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी व पुलअप्सची मैदानी चाचणी दिली.
१३ मार्च २०१८ रोजी हिरज याठिकाणी १,६०० मीटर धावणे चाचणीच्या वेळी चेस्ट क्र. ५६४ नागेश गोविंद वाघमारे याने चेस्ट क्र. ५६६ सोमनाथ हरिदास पवार याचे चेस्ट क्रमांक घातला.
त्यानंतर चेस्ट क्र. ५६६ सोमनाथ हरिदास पवार याने चेस्ट क्र. ५६५ भीमाशंकर नारायण पवार याचे चेस्ट क्रमांक एकमेकांच्या संगनमताने आपापसात बदलले.
त्यानंतर बदललेल्या चेस्ट नंबरचा उमेदवार आहे, असे संबंधित चाचणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना भासवून पोलिस भरती प्रक्रियेतील गुणतक्ते हे संबंधित उमेदवारांचे निवड प्रक्रियेसाठी वापरले जाणार असल्याचे माहीत असूनदेखील शासनाची फसवणूक केल्याचे सांगत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याकामी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. ए.पी. काळे, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. कोकणी ए.आय. यांनी काम पाहिले, तसेच त्यांना याकामी पोलिस कोर्ट कर्मचारी रुपनर यांचे सहकार्य लाभले.
यांची ठरली साक्ष महत्त्वाची
जेलरोड पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते. या खटल्याची सुनावणी ही न्यायदंडाधिकारी डी.डी. कोळपकर यांच्यासमोर झाली.
आरोपींचे गुन्हे शाबितीच्या कामी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी एपीआय रवींद्र शांताराम गायकवाड, इतर साक्षीदार, तसेच घटनेचे तपासिक अंमलदार शिंदे, एपीआय यांची साक्ष महत्त्वाची ठरली.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज