टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण ९५ टक्क्यांहून अधिक भरले आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने केले जाईल, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी स्पष्ट केले.
उजनी धरणात पाणीसाठा वाढल्याने जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मोठी मदत झाली आहे. यंदाच्या गाळप हंगामात जवळपास २७ कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप घेतील, असा अंदाज आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणाला धरणामुळे बळकटी आली आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न धरणाच्या माध्यमातून सुटण्यास मदत झाली. शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत धरण ९५.४९ टक्क्यांपर्यंत आले होते. दौंड व बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग चांगला असल्याने काही दिवसात धरण १०० टक्के भरेल, असा विश्वास साळे यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने धरण पुढील आठवड्यात शंभर टक्क्यांची पातळी ओलांडेल, असेही ते म्हणाले. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. यंदाचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या मान्यतेने ठरणार आहे.
पुढच्या आठवड्यात धरण १०० टक्के भरेल. दौंड व बंडगार्डनमधून चांगला विसर्ग येत आहे. कालवा सल्लगार समितीच्या मान्यतेने पाण्याचे पुढील नियोजन ठरणार आहे. सर्वांनी काटकसरीने पाणी वापरावे. -धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज