टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या दोन तरुणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आलेल्या आमदार पडळकर यांच्या गाडीवर श्रीशैल नगर येथे दगडफेक करण्यात आली होती. त्याचप्रकरणी आता दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि निलेश क्षीरसागर हे दोघेही मागील तीन दिवसांपासून फरार होते. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पकडणं हे पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेर त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथून शनिवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, दगडफेक करणारा हा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. तसेच त्याने दगडफेकीसारखे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले आहे का? याचा देखील तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली आहे.
आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर काय टीका केली होती?
‘मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांचे या राज्यात 3 ते 4 खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही.’
‘दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण कोंबड्याला काय वाटतं की, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या.
पण यांचं असं झालेलं आहे की, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशीबात… अशी परिस्थिती या लोकांची चालू आहे.’ अशी टीका पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्याचदिवशी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज