कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी खुले करुन आज एक महिना पूर्ण झाला आहे.
महिन्याभराच्या काळात राज्यासह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठुरायाचे मुख दर्शन घेतले आहे. याच दरम्यान, विठुरायाच्या दान पेटीत 35 लाख 50 हजार रुपयांचे दान जमा झाले आहे.
मात्र, गेल्या वर्षी याच महिन्यात दोन कोटी इतके दान प्राप्त झाले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली
कोरोना संकटामुळे लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेले पंढरपूर येथील विठुरायाचे मंदिर तब्बल आठ महिने बंद होते. सरकारी आदेशानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांना फक्त मुखदर्शनासाठी खुले केले होते. मंदिर सुरु होऊन आज एक महिना पूर्ण झाला.
गेल्या आठ महिन्यांपासून देवाच्या दर्शनासाठी आसुसलेले भाविकही नियमांचे कोटेकोरपणे पालन करत पंढरीनाथाच्या चरणी लीन होत आहेत. महिन्याभराच्या काळात राज्यसह देशभरातील सुमारे 37 हजार भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन घेतले आहे.
या काळात आषाढीसह कार्तिकी यात्रेचा सोहळाही प्रातिनिधिक स्वरुपात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तब्बल आठ महिने बंद असल्याने समितीला मिळणाऱ्या देणगीवर देखील मोठा परिणाम झाला होता.
याच काळात मंदिर समितीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना मदत देखील केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने येथील अर्थकारणही काही प्रमाणात सुरळीत होऊ लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज