टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
मंगळवेढा सांगोला आटपाडी, जत या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांनी मोठी चळवळ उभी केली असल्याचे प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे.
धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी शरद पवार बोलत होते.
व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राहुल शहा,
माजी आमदार राजन पाटील, रामहरी रूपनर, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी, चेतन नरुटे, धनाजी साठे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, भगीरथ भालके, बाळासाहेब शेळके, प्रकाश पाटील यांचेसह जिल्ह्यातील आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोकं या दुष्काळी भागात जन्माला आली, दु्ष्काळी भागातील लोक सन्मानाने जगण्यासाठी काय करतील नेम नाही, त्याच प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी मोठया जिद्दीने सर्वसामान्य जनतेसाठी सर्व काही उभे केले आहे.
अनेक लेखक देखील दु्ष्काळी भागात वाढले, साहित्याच्या क्षेत्रात चांगल काम केलं, अनेक नेते देखील याच मातीत जन्माला आले, या भागातच प्रा.शिवाजीराव काळुंगेही जन्माला आले. इतिहासाला दृष्टी देणारा हा भाग आहे, असं शरद पवार म्हणाले.
या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीत शेती, पाणी, शिक्षण, सहकार आणि समाज उभारण्यासाठी पती-पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली.
त्यातून अनेक संस्थाची उभारणी देखील केली असून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेम विवाह केल्याची चिंता सुशीलकुमार शिंदे यांना का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थित जोरदार हसा उमटला.
माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, हाडाच्या शिक्षकी पेशातून काळुंगे परिवारांने एवढा मोठा आर्थिक संस्थेचा डोलारा उभा करताना नवा समाज घडविण्याचे काम केले. आर्थिक संस्था चांगल्या चालवून दाखवल्या. यावेळी हर्षवर्धन पाटील, जयवंत बोधले, अभिजीत पाटील, यांची भाषणे झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिताराम महाराज कारखान्याच्या सिओ राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे यांनी केले. सुत्रसंचालन इंद्रजित घुले व श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार गौरव समितीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज