मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील १ ते ८ वर्गातील २७ हजार ३७८ विदयार्थ्यांना प्रती पुस्तकाचे संच मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शासनाकडून १ ते ८ वर्गातील मुलांना मोफत पाठ्यपुस्तक देण्याची घोषणा करण्यात आली होती. दि. १५ जून पासून शैक्षणीक वर्ष सुरु होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके प्राप्त व्हावीत या उद्देशाने तत्पुर्वी मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळेत पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
शाळापुर्व तयारीसाठी शिक्षकांनी शाळेत जावून शाळेची स्वच्छता करण्याच्या सुचना देण्यात आल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुस्तकासोबत गणवेशही वाटप केला जाणार आहे.
नवीन मुलांचे गुलाबाचे फुल व स्वीट पदार्थ देवून स्वागत करण्यात येईल. तसेच ज्या शाळेत मुलांची पटसंख्या शंभर टक्के उपस्थित राहतील त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देवून त्यांचेही अभिनंदन करण्यात येणार आहे.
मुलांच्या स्वागतासाठी बैलगाडीतून, चारचाकी, दुचाकी व्दारे गावातून मिरवणूक काढून त्यांचे भव्य स्वागत करुन हवेत फुगे सोडून शाळास्तरावर स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शाळेची वेळ १०.३० ते ५ अशी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, केंद्रप्रमुख विष्णूपंत धोत्रे, पुरुषोत्तम राठोड, विष्णू चव्हाण तसेच प्रभारी केंद्रप्रमुख यासाठी परिश्रम घेत आहेत.
आजपासून वाजणार साडेतीन हजार शाळांची घंटा
सोलापूर जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक शाळांची आज पहिली घंटा वाजणार आहे. त्यासाठी अनेक शाळांनी पहिल्यांदाच शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांसाठी बैलगाडी, उंट, घोडा, कारगाडी अशी व्यवस्था केली आहे.
शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५, माध्यमिक विभागाच्या एक हजार ५३ आणि खासगी ५२७ शाळांमध्ये जवळपास पाच लाख मुलांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.
पहिल्या दिवशी गावातून, नगरातून प्रभातफेरी, शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, फुगे व फुलांची सजावट केली आहे. शाळेत येताना मुलांचे औक्षण केले जाणार आहे. शाळेचा पहिला दिवस चिमुकल्यांसह शिक्षकांचाही आनंदाचाच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप होईल. काही शाळा मुलांना गोड भात देतील, अशी ,माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली.
आधार प्रमाणीकरणाची मुदत आज संपणार
जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक शाळा व खासगी अनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमधील जवळपास ३८ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अजूनही शाळांना मिळालेले नाहीत. त्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत १५ जूनपर्यंतच असल्याने शिक्षकांना शाळेच्या पहिल्याच दिवशी ते काम पूर्ण करावे लागणार आहे. मुदतवाढीची शक्यता आहे, पण त्याचाही आदेश आज निघतोय का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या दिवशी गणवेश पाठ्यपुस्तके मिळणार
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळणार आहे. दुसरीकडे सर्वांनाच पाठ्यपुस्तके देखील दिली जाणार आहेत. परंतु, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची सरकारने ग्वाही देऊनही यंदा दरवर्षीप्रमाणे केवळ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार आहे. दुसरा गणवेश कधी मिळणार हे अस्पष्टच आहे. दुसरीकडे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळणार अशी स्थिती नाही. अजून अनेकांचे गणवेश शिलाई झालेली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज