टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतरही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला असून त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीणमधील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या पाच तालुक्यांतील रुग्ण वाढणाऱ्या गावांत कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत असल्याची चिंता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.रुग्णवाढ वेळेत न थांबल्यास शेजारील तालुक्यांमध्येही रुग्ण वाढतील, अशी भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली.
त्यामुळे संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी बोलून दोन-तीन दिवसांत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सूचना केल्या.
निर्बंध कडक करताना संपूर्ण तालुक्यात होणार की रुग्ण वाढत असलेल्या गावांपुरतेच राहणार, याचा निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाणार आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असतानाही निर्बंध कायम ठेवल्याने हातावरील पोट असलेल्यांसह व्यापारी, व्यावसायिकांची मोठी पंचाईत होऊ लागली आहे. त्यांच्यासमोरील अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे शहरातील निर्बंध उठवावेत, असा माझा आग्रह आहे, परंतु निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही, असेही भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याच्या मुख्य सचिवांना त्यासंबंधीचा मेसेज केला असून त्यांच्याकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
….अन् भरणे यांची पंचाईत झाली
सोलापूर शहरातील कोरोना रुग्णवाढीचा (पॉझिटिव्हिटी रेट) दर 1.87 टक्के असून मृत्यूदरही आटोक्यात आहे. सोलापूर शहराची लोकसंख्या साडेबारा लाखांहून अधिक असल्याने स्वतंत्र युनिट समजून निर्बंध शिथिलतेसाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी सरकारला पाठविला आहे.
त्यावर अजून निर्णय झाला नसल्याने पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना त्यांच्या मोबाईलवरून मेसेज केला.
मात्र, काही तासानंतरही मुख्य सचिवांकडून मेसेजला उत्तर न मिळाल्याने पत्रकार परिषदेत ठोस उत्तर देताना त्यांची पंचाईत झाली.
दिलासा देण्याचा माझाही प्रयत्न
सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे कमी झाला आहे. तरीही, निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील निर्बंध शिथिल व्हावेत, यासाठी माझाही प्रयत्न सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावावर काही दिवसांत निर्णय होईल, असा विश्वासह भरणे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज