टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्लोबल शिक्षकाचा पुरस्कार मिळवणारे सोलापूरचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी हे अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेत पी.एच.डी. करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता.
परंतू या अर्जात त्रुटी असल्याचं सांगत जिल्हा शिक्षकअधिकाऱ्यांनी डिसलेंवर आरोप केले आहेत. याचसोबत जिल्हा परिषद डिसले गुरुजींवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय.
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या म्हणजेच शासकीय नोकरीवर असल्यामुळे अध्ययनासाठी रजा मागताना जिल्हा परिषदेकडे अर्ज करणं बंधनकारक असतं.
रणजितसिंह डिसलेंनी हा अर्ज केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या पीएचडी अभ्यासातून शाळेला आणि शिक्षण विभागाला काय फायदा होणार आहे हे डिसले यांनी अर्जात नमूद केलेलं नसल्याचं जिल्हा परिषदेचं म्हणणं आहे.
इतकच नव्हे डिसले गुरुजींनी शाळेवर न जाता तीन वर्षांचा पगार उचललल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करुन डिसले गुरुजींकडून तीन वर्षांचा पगार वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
काय आहे नेमकं प्रकरण?
चार डिसेंबर २०२१ रोजी अमेरिकन सरकारकडून जगभरातील ४० शिक्षकांना प्रतिष्ठेची फुलब्राईट शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातून रणजीत डिसले यांची निवड करण्यात आली. ‘पीस इन एज्युकेशन’ या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठाकडून डिसले यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
डिसले गुरुजी यांना यासाठी ६ महिने अमेरिकेत जायचे आहे. दरम्यान त्यांनी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजेचा आणि परदेश प्रवासाच्या अनुमतीचा अर्ज केला होता. गुरुवारी डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्हापरिषदेचे प्रशासन प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप –
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींवर मात्र गंभीर आरोप केले आहेत. रणजित डिसले हे लोकांची दिशाभूल करतात. तसेच जिथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती होती, त्याठिकाणी ते मागील ३ वर्षांपासून गैरहजर आहेत, तसा रिपोर्ट संबंधित प्राचार्यांचा आहे.
डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला ही आनंदाची बाब आहे, तरी त्याचा त्यांच्या शाळेला काही फायदा झालाय असे मला वाटत नाही. तीन वर्षांपासून गैरहजर असताना फायदा होईल तरी कसा? असा प्रश्न शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केलाय.
डिसले यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय कमिटी नेमलेली होती, त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यावर आमचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीररित्या जी काही कार्यवाही करणे गरजेचे आहे ती केली जाईल, असे डॉ. किरण लोहार यांनी सांगितले.
दरम्यान रणजितसिंह डिसले यांनी याविषयावर बोलताना अद्याप या विषयावर आपल्याला कोणताही लेखी आदेश मिळालेला नाही. हा लेखी आदेश आल्यानंतर आपण यावर आपली भूमिका स्पष्ट करु असं सांगितलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज