टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनीच्या ५ टीएमसी पाणी प्रश्नामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रचंड गोची झाली आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी मामांची अवस्था झाली आहे. आपल्या इंदापूर तालुक्याला पाणी देण्यासाठी पालकमंत्री पदावर पाणी सोडण्याची तयारी भरणे मामांनी दर्शविली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांनी खा.शरद पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे आता ‘मामा’ जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सोलापूरला चौथे पालकमंत्री मिळणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सुरवातील सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ना. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात आली. एक अभ्यासू व वजनदार नेत्याकडे पालकमंत्री पद दिल्याने जिल्ह्याला शिस्त लागेल आणि अधिकाऱ्यांवर वचक राहिल अशी अपेक्षा सोलापूरकरांची होती.
मात्र कोरोना काळात वयोमनामुळे त्यांना फिरणे अवघड बनले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून पालकमंत्री पद नको म्हणून सोडून दिले. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले.मात्र , त्यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर सोलापूरला येणं टाळलं.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवरील म्हणजे इंदापूरचे ना.दत्तात्रय भरणे यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले. ना.भरणे यांनी सुरुवातीला कोरोना काळात सर्वांना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. कोरोना वार्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यामुळे त्यानंतर अलिकडच्या काळात त्यांच्या आरोप होण्यास सुरुवात झाली.
मध्यतरी पंढरपूर पोटनिवडणुकीत महिनाभर ना.भरणे सोलापूरकडे फिरकलेही नाही, आचारसंहिता असल्याचे सांगत सोलापूरला देण्याचे टाळले. दरम्यान, ‘उजनीतील पाणी पळविण्याच्या प्रश्नांवर राजकारण चांगलेच पेटले . राष्ट्रवादी पक्षाचे आमदारच पाणी प्रश्नी ना.भरणे यांना धारेवर धरले.
पक्षश्रेष्ठींकडे मुद्दा पटवून देऊन पाणी पळविण्याचा आदेश शेवटी रद्द करुन आणला. तेव्हापासून ना.भरणे यांना पालकमंत्री पदावर काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या. जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाचविण्यासाठी ना.भरणे यांच्याकडून पालकमंत्री पद काढणे किती महत्त्वाचे आहे , हे पटवून दिले.
त्यामुळे आता ना.भरणे यांना पालकमंत्री पदावरुन हटविणे हे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या हटवून आता कोणाकडे जबाबदारी द्यायची याबाबत श्रेष्ठींमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
ना.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा सोलापूरची जबाबदारी देणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. ना.जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. शिवाय काँग्रेसचेही सोलापूरचे पालकमंत्री आपल्याकडे मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.(स्रोत:पुण्यनगरी:विठ्ठल खेळगी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज