टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा एस.टी.बस आगाराने कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी प्रवाशांनी बसमध्ये चढताना मास्कचा वापर जरूर करावा अन्यथा मास्क नाही तर तिकीट नाही असा इशारा आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांनी दिला आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने याला रोखण्यासाठी मास्क वापरणे, डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या सोलापूर जिल्हयातही कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाचे चित्र असल्याने रात्रीची संचारबंदीही पुकारण्यात आली आहे.
एस.टी.मध्ये प्रवास करताना प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक असतानाही काही प्रवाशी मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवेढा आगाराने मास्क नाही तर प्रवाशांना तिकीट नाही अशी अभिनव संकल्पना राबविण्याचे नियोजन केल्याचे एस.टी.सुत्रांकडून सांगण्यात आले.
सध्या सोलापूर मार्गावर प्रत्येकी अर्ध्या तासाला ६० फेऱ्या , तर पंढरपूर मार्गावर ३२ फेऱ्या ठेवण्यात आल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले.मध्यंतरी कोरोनामुळे एस.टी.चे उत्पन्न थांबले होते.
सध्या बसेस पुर्ववत झाल्याने एस.टी.च्या उत्पन्नात वाढ होत असताना कोरोनाची भर पडत असल्याने पुन्हा एस.टी.च्या पुढे संकटाचा डोंगर उभा आहे.परिणामी प्रवाशांनी सर्व नियमांचे पालन केल्यास एस.टी.बंद करण्याची वेळ येणार नाही.
यासाठी नैतिक जबाबदारी म्हणून प्रवाशांनी मास्क वापरून महामंडळास सहकार्य करावे.सध्या मंगळवेढा आगाराकडे ६० बसेस असून त्यामधील ६ बसेस मुंबईसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
सध्या मंगळवेढा आगाराच्या ५४ बसेस रस्त्यावर धावत आहेत.यासाठी ११४ चालक व १०७ वाहक परिश्रम घेत आहेत.मुंबईसाठी ७ वाहक व ७ चालक गेल्याने याची कमतरता मंगळवेढा आगाराकडे जाणवत असल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम देवून सेवा बजावावी लागत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज