टीम मंगळवेढा टाइम्स ।
कोविड लस ही कोरोना आजाराविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी दिली जाणारी लस आहे. मात्र, वैराग (ता. बार्शी) येथे चक्क मृत व्यक्तीच्या नावावर कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.
आरोग्य खात्याने मृत व्यक्तीला लस देऊन अप्रत्यक्षरीत्या जिवंतच दाखविले आहे. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येथील यशोदा बाबासाहेब धावारे (वय 62) यांनी 12 मार्च 2021 रोजी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा पहिला डोस घेतला.
मात्र त्यांचे 25 जून 2021 रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. निधनानंतर तब्बल 111 व्या दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2021 रोजी लसीचा दुसरा डोस दिल्याचा अधिकृत संदेश नातेवाइकाच्या मोबाईलवर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीला दुसरा डोस देण्याचा प्रताप आरोग्य विभागाने केला आहे. संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाइकांमधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृताच्या नावे बोगस व गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आमच्या माणसाचा आम्ही आपल्या हाताने अंत्यविधी केला; तरीही त्यांनी लस कशी घेतली, असा प्रश्न नातेवाइकांकडून विचारला जात असून, आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे नातेवाइकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण नोंदणी कोणी केली? नोंदणी करून ती लस नेमकी कोणाला दिली? उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण उरकले जात नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण केले जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज