मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमधील कंपन्यांनी विविध करार केले. यानुसार, अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक एअरोस्पेस कंपनीने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) बरोबर ‘एफ४१४’ इंजिनची सहनिर्मिती करण्याबाबतचा सामंजस्य करार केला आहे.
या करारावर मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याशिवाय, संयुक्त अवकाश मोहिमेसाठीही ‘नासा’ आणि ‘इस्रो’दरम्यान करार झाला आहे.
जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि ‘एचएएल’ यांच्यातील करारानुसार, भारतीय लष्कराच्या गरजेनुसार लढाऊ विमानांसाठी अत्यंत उच्च दर्जाची इंजिनची सहनिर्मिती केली जाणार आहे. ‘एफ४१४’ हे अत्यंत उच्च क्षमतेचे इंजिन असून दोन्ही देशांच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेत यामुळे मोलाची भर पडेल, असे ‘जीई’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या इंजिनचा वापर भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाई विमानांमध्ये केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या इंजिननिर्मितीचे ८० टक्के तंत्रज्ञान भारताकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ आणि ‘इस्रो’ यांनी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर संयुक्त मोहिम नेण्यास सहमती दर्शविली आहे.
नागरी उद्देशाने अवकाश मोहिमा राबविण्यासाठी असलेल्या ‘आर्टिमिस ॲकॉर्ड’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय भारताने याद्वारे घेतला आहे. अवकाश मोहिमांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या, मात्र कोणावरही बंधनकारक नसणाऱ्या सूचनांचा समावेश ‘आर्टिमिस ॲकॉर्ड’मध्ये आहे.
या वर्षी अवकाश मोहिमेचा आराखडा तयार करण्यासाठी ‘नासा’ आणि ‘इस्रो’ प्रयत्न करतील, असे ‘नासा’च्या अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व घोषणांवर मोदी-बायडेन यांच्यातील चर्चेनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.
नॅनो युरियाची अमेरिकाला निर्यात
भारतात विकसित केलेला नॅनो युरियाची आता अमेरिकेला निर्यात होणार आहे. ‘इफको’ या सहकारी संस्थेने कॅलिफोर्नियातील कपूर एन्टरप्रायजेस सोबत सामंजस्य करार केला असल्याचे ‘इफको’ने जाहीर केले आहे. नॅनो युरिया उत्तम पौष्टिक गुणवत्तेसह उत्पादन वाढवते आणि रासायनिक खतांचा वापर कमी करते.
हे पाणी, हवा आणि मातीचे प्रदूषण कमी करते, ज्याचा भूगर्भातील पाणी आणि मातीच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. परिणामी, हवामान बदलावर सकारात्मक प्रभाव पडतो, ग्लोबल वार्मिंगमध्ये लक्षणीय घट होऊन शाश्वत शाश्वत विकास होतो. इफको नॅनो युरिया (द्रव) वनस्पतींच्या पोषणासाठी प्रभावी आणि कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे.
हे करार अपेक्षित
भारतात इंजिनची निर्मिती करण्यास जनरल इलेक्ट्रिक कंपनीला परवानगी, अमेरिकी नौदलाच्या जहाजांना भारतीय बंदरांवर दुरुस्तीच्या कामासाठी येण्यास परवानगी
अमेरिकेकडून एमक्यू-९ बी सी-गार्डियन ड्रोन खरेदी, एच-१ बी व्हिसाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नवीन सुविधा, सिएटलमध्ये भारताची तर अहमदाबाद, बंगळूरमध्ये, अमेरिकेची वाणिज्य कचेरी उघडणार, ‘मायक्रॉन’ गुजरातमध्ये गुंतवणूक करणार
भारतात सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’च्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर या कंपनीने भारतात ८० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून भारतीय राष्ट्रीय सेमीकंडक्टर अभियानाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण २.७५ अब्ज डॉलरचा हा प्रकल्प असेल. अमेरिकेतील ॲप्लाइड मटेरिअल्सनेही भारतात सेमिकंडक्टर केंद्र उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.(स्रोत:सकाळ)
दहशतवादाविरोधात भारत-अमेरिका एकत्र
अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि अतिरेक्यांचा सामना करण्याच्या गरजेवर भर दिला. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी हल्ला चढवला. लोकशाही, कायद्याचे राज्य आणि मानवी हक्कांसाठी दहशतवाद हा खरा धोका असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत आणि अमेरिका दहशतवाद आणि अतिरेकाविरुद्धच्या लढाईत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे यावर आम्ही सहमत आहोत.
मोदींचा क्रेज…75 वेळा टाळ्यांचा गडगडाट, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी रांग
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहिनी अमेरिकेतही आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्याची अनेक झलक पाहायला मिळाली. त्यांच्या भाषणादरम्यान सुमारे 75 प्रसंग आले जेव्हा अमेरिकन संसदेच्या खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. याशिवाय सुमारे 15 असे प्रसंग आले की, उभे असताना त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी स्पर्धा लागली होती. प्रत्येकाला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचे होते किंवा फोटो काढायचे होते. पीएम मोदींनीही त्यांना निराश केले नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज