उजनी धरणात सध्या 110 टक्के पाणीसाठा असून त्यात 58.94 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाळ्यानंतर रब्बी पिकांसाठी आता 10 जानेवारीला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीत त्यावर अंतिम निर्णय होणार असून डिसेंबरअखेर समितीची बैठक होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांखाली तीन लाख 50 हजार 817 हेक्टर एवढे क्षेत्र आहे.तर 38 हजार 803 हेक्टर एवढे गहू या पिकाखालील क्षेत्र आहे.
मकेचे क्षेत्र 34 हजार 258 हेक्टर असून तृणधान्याचे जिल्ह्यात चार लाख 24 हजार 423 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 47 हजार 235 हेक्टरवर तृणधान्यांची लावगड झाली आहे. हरभरा पिकाचे एकूण क्षेत्र 57 हजार 79 हेक्टर असून सुर्यफूलाचीही लागवड काही ठिकाणी झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. पावसाळा संपून आता दोन महिन्यांचा कालावधी होत असून रब्बी पिकांना डिसेंबरनंतर पाण्याची गरज भासणार आहे.
कोरोनामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप होऊ शकलेली नाही. दरम्यान, 10 जानेवारीदरम्यान उजनीतून पाणी सोडण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. मात्र, त्यावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडल्याचा फायदा
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असल्याने मागील कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात एक तर रब्बी हंगामात दोन आवर्तने उजनीतून सोडली जात होती. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची खरी गरज भासत असल्याने आणि रब्बीच्या पिकांमध्ये मोठी घट झाली असून जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी शेतकरी हितासाठी प्रायोगिक बदल केला. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. आता त्यानुसार रब्बी हंगामात एक तर उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याचा प्रस्ताव कालवा सल्लागार समितीपुढे ठेवला जाणार आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे.(सकाळ)
कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय
रब्बीसाठी एक तर उन्हाळ्यात दोन आवर्तने उजनी धरणातून सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. तर जानेवारीत पाणी सोडण्याचे नियोजन असून त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.– धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज