टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे. तालुका अध्यक्ष बदलानंतर आता थेट विधानसभा मतदारसंघ पक्ष निरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आली आहे.
पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांना हटवून त्यांच्या जागी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील गटबाजीही उघड झाली आहे.
त्यातून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटलांसह जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार भगीरथ भालके यांना थेट आव्हान दिले आहे.त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधील गटबाजी संपविण्यासाठी आता पक्षाने पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांना हटवून त्यांच्या जागी संजय पाटील यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या पंढरपूर तालुक्यात पक्षांतर्गत गदारोळ सुरू आहे. या गदारोळाची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीचा पक्षाच्या उमेदवाराला फटका बसू नये याची काळजी आता घेतली जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्षपदावरून दीपक पवारांना हटवून त्यांच्या जागी विजयसिंह देशमुख यांची निवड केली आहे. तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये घमासान सुरू आहे.
पक्ष निरीक्षक सुरेश घुले पंढरपूर दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आल्यानंतर सुरेश घुले यांना पक्ष निरीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संजय वसंतराव पाटील यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी श्री. पाटील यांना नियुक्तिचे पत्र देऊन मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार नवीन पक्ष निरीक्षक संजय पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उद्या पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली आहे. ते दोन दिवस पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.(सकाळ)



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














