टीम मंगळवेढा टाईम्स।
लम्पी आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
शासनाकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबरोबरच सामाजिक दायित्व म्हणून पिचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी लम्पी आजाराने मृत्युमुखी पडलेल्या
जनावरांच्या मालकांना जिल्हा परिषद सेसमधून प्रत्येक जनावरामागे दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या सूचना
पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे यांना दिल्या आहेत.
पालकमंत्री विखे-पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील लम्पी आजाराचा आढावा घेतला.
आजपर्यंत लम्पी आजाराने सोलापूर जिल्ह्यातील ७८ जनावरांचा बळी गेला आहे. त्यापैकी नुकसान भरपाईसाठी २९ प्रस्ताव दाखल झाले. ९ मृत जनावरांच्या मालकांना ७ लाख ८८ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
लम्पी आजाराने दुभत्या जनावराचा मृत्यू झाल्यास ३० हजार, बैलास दावल्यास २५ हजार तर ओढ काम करणाऱ्या जनावराचा मृत्यू झाल्यास १६ हजार अशी नुकसान भरपाई शासन धोरणानुसार देण्यात येत आहे.
मात्र, ही आर्थिक मदत अतिशय तोकडी असून त्यात वाढ करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे अनेक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केली होती.
त्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसोबतच लम्पीने मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक जनावरामागे जनावर मालकास १० हजार रुपये जिल्हा परिषदेच्या सेसमधून आर्थिक मदत देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. (स्रोत:पुण्यनगरी)
पालकमंत्र्यांच्या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी : डॉ .नरळे लम्पी
आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना जिल्हा परिषदेच्या सेसमधून प्रत्येक जनावरामागे १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केल्या आहेत.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून सेसमधून आर्थिक मदतीची तात्काळ तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे यांनी दिली.
औषध खरेदीसाठी जिल्हा परिषद सेसमधून ७५ लाख
जिल्ह्यात लम्पी आजार नियंत्रणात राहावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ठोस भूमिका घेत जनावरांची औषधे खरेदी करण्यासाठी ७५ लाखांचा सेस निधी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला तात्काळ दिला होता.
स्वामी यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्राप्त झालेल्या निधीतून वेळीच औषधे खरेदी करण्यात आल्याने जिल्ह्यात लम्पी आजार सध्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नियंत्रणात आहे.
मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची तालुकानिहाय संख्या (कंसात शासनाकडून देण्यात आलेली नुकसान भरपाई) – –
मंगळवेढा-२ (प्रस्ताव प्राप्त नाही ), करमाळा – २३ ( २ लाख २६ हजार ) , माढा – ५ ( २५ हजार ) , माळशिरस – २४ ( १ लाख ९ २ हजार ) , पंढरपूर – ३ ( ९ ० हजार ) , सांगोला – १० ( १ लाख ५० हजार ) , उत्तर सोलापूर – १० ( १ लाख ५ हजार ) , दक्षिण सोलापूर – १ ( प्रस्ताव प्राप्त नाही ) . एकूण मृत जनावरे – ७८. नुकसान भरपाई देण्यात आलेली जनावरसंख्या – २९. एकूण आर्थिक मदत – ७ लाख ८८ हजार.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज