टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात सरकारमध्ये सत्तेत असूनदेखील मंगळवेढा तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विशेषतः पक्षाच्या सरपंचांची कामे होत नसतील तर त्या पक्षात राहून काय फायदा, असा सवाल राष्ट्रवादीचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष यांना जाब विचारला.
मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, ओबीसी सेल सेलचे लतीफ तांबोळी,
रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, उपाध्यक्ष रामचंद्र जगताप, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, विजयकुमार खवतोडे,
व्यकंट भालके, भारत बेदरे, रामेश्वर मासाळ, शिवाजीराव काळे, शिवानंद पाटील, चंद्रशेखर कोंडुभैरी, वृषाली इंगळे, गुलाब थोरबोले, बसवराज पाटील, तानाजी काकडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष साठे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही गट तट न ठेवता मोठ्या ताकतीने लढवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जोमाने सुरू ठेवावे. सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही काम असू द्या. काम होत नसेल मला संपर्क करा. मी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दररोज असतो.
प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीचे सदस्य नसलेली मंडळी व्यासपीठावर दिसता कामा नये. पक्ष संघटनेची पदे देतानादेखील विचार करून दिली पाहिजेत.
पक्षनेते अजित जगताप म्हणाले की, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी ग्रामीण भागातील सरपंचांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत. पोटनिवडणुकीनंतर अनेक ठिकाणी कामासाठी आडकाठी होत आहे, त्यामुळे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी संपर्क कार्यालयात थांबून ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवावेत.
लतीफ तांबोळी म्हणाले की, 2024 चा विचार करता भगीरथ भालके हेच आपले उमेदवार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या कामासाठी भारत भालके प्रशासनाला झापून उलट फोन करून सांगायचे. जा त्या अधिकाऱ्याला भेट, तुझे काम होईल. परंतु सध्या चार-पाच महिने झाले, हे बंद झाले आहे.
गुलाब थोरबोले म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळावर राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, राज्यात सत्ता आहे, (स्व.) भालके असताना ग्रामीण भागातील सरपंचांची कामे होत होती. परंतु अलीकडच्या काळात या सरपंचांची कामे होत नाहीत.
उलटपक्षी या कार्यक्रमाला माणसे गोळा करा, असे सांगता. माणसे हवी तेवढी गोळा करतो. पण, पक्षाने ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या सरपंचांची व कार्यकर्त्याची कामे झाली पाहिजेत;
अन्यथा तालुक्याचे पद घेण्यापेक्षा गावगाड्यात गावातलीच कामे करत बसलेले बरे, अशी भूमिका मांडत गतवर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्याच्या दक्षिण भागात या गावांत सोडण्यात आले. या वर्षी पूर येऊनदेखील या योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आलेले नाही. मग सत्तेचा आणि तालुक्यातील पद घेऊन काय फायदा? असा प्रश्न उपस्थित केला.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज