मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून, अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते. त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. या योजनांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ देण्यात येत असल्याने निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. यंदापासून कृषी विभागाच्या योजनांचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅकचा शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून करीत आहेत.
लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येत आहे. लाभार्थी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सहायक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्जाची व कागदपत्रांची छाननी करण्यात येते.
मात्र, ही छाननी करताना शेतकऱ्यांचा सातबारा, ८ अ उतारा व आधार क्रमांक ही कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे क्षेत्रीय स्तरावरून त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून माघारी पाठविले जात आहेत.
वास्तविक महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करताना शेतकऱ्याचा ओळख क्रमांक घेतल्यामुळे शेतकऱ्याचे नाव, जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे व गट क्रमांक, एकूण क्षेत्र ही माहिती उपलब्ध होते. त्यामुळे कागदपत्रांची छाननी करताना शेतकऱ्याचा सातबारा, ८ अ व आधार कार्ड ही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
ही कागदपत्रे नसल्यास अर्ज त्रुटी काढून परत पाठवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ऊहापोह झाल्यानंतर ही बाब मांढरे यांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर हे निर्देश दिले आहेत.
प्रथम प्राधान्य तत्त्वावर निवड
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून करीत आहेत. लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येत आहे. लाभार्थी निवड झाल्यावर कागदपत्रे अपलोड करायची आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना
अर्ज परत पाठविल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर हे निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी सहायक कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांकडून सातबारा, आठ अ उताऱ्याची मागणी होत होती. काही शेतकरीसुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याने सातबारा व आठ अ घेऊन पोर्टलवर अपलोड करत होते. यानंतर ही कागदपत्रे देण्याची गरज नाही. यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. परिणामी अर्ज मंजुरीची कार्यवाही जलद गतीने होईल.सूरज मांढरे, आयुक्त, कृषी विभाग
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज