मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भगीरथ भालके यांनी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याने त्याचा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर कोणताही परिणाम होणार नाही.
पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीची शक्ती आहे तशीच राहणार, त्यात कोणताही बदल होणार नाही. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत मंगळवारी भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
स्व. भारत भालके यांची पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात एक वेगळीच ओळख होती. ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा विजय निश्चित होता.
पण त्यांचे सुपूत्र भगिरथ भालके यांची मतदारसंघावर पकड मजबूत नाही. त्यामुळे भगिरथ भालके यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेशानंतरही राष्ट्रवादीची ताकद आबाधित असल्याचे साठे म्हणाले.
माजी खासदार धर्मणा सादुल यांच्या बीआरएस प्रवेशाने तेलुगू भाषिकांत थोडाफार परिणाम होऊ शकतो. आपण तेलुगु समाजातील अनेकांशी चर्चा केली. मात्र बीआरएस या पक्षाचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे त्यांचे मत असल्याचेही यावेळी साठे यांनी स्पष्ट केले.
ही भाजपाची बी टीम
बीआरएस ही भाजपचीच बी टीम आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे. राज्यातसुध्दा बीआरएस या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. सोलापूर जिल्ह्यातही याचा कोणताच परिणाम होणार नाही. नुकतीच पंढरपुरात राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकत्यांची बैठक घेतली. यावेळी अनेकांनी आम्ही राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगितले असल्याचे साठे म्हणाले.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज