मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील काही अधिकारी आणि पोलिसांचे कारनामे समोर येऊ लागले. गुन्हेगारांशी संबंध ते त्यांच्या काळ्या धंद्यांमध्ये भागिदारी असे अनेक प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत.
अशातच आता बीड पोलिस दलात एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असे म्हणत 107 पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यात नेमकं असं काय घडतंय ज्यामुळे पोलिस अधिकारी या ठिकाणी ड्युटी करण्यास अनुत्सुक आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री असलेल्यां बीड जिल्ह्यात का नको? या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती. मात्र अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने त्याची चर्चा होत आहे.
अजितदादा यांनी पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे पोलिस दलातील काही अधिकारी आणि शिपायांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचं दिसतंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड का नको?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची प्रतिमा बदलल्याचं दिसून आलंय. या हत्या प्रकरणातील आरोपींसोबत पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील याच्यासह काही पोलिसांचे व्यवहारिक संबंध असल्याचं दिसून आलं. भाजपचे आमदार सुरेश धसांनीही अनेक पोलिसांवर आरोप करत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातिवाद, त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यातच आयपीएस अधिकारी नवनीत कावत यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतरही अनेक अधिकाऱ्यांनी त्याचा धसका घेतल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील तब्बल 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बीडबाहेर बदलीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
पोलिसांना पूर्ण नावाऐवजी आता पहिल्या नावाचीच नेमप्लेट
बीडच्या पोलिस दलात एक मोठा बदल करण्यात आला आहे. पोलिसांच्या पूर्ण नावाऐवजी आता केवळ पहिल्या नावाची नेमप्लेट असणार आहे. पोलीस दलातील जातिवाद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी संकल्पना समोर आणली आहे. 1 मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा प्रयत्न सुरू आहे. बीडच्या पोलिस दलात आडनावाऐवजी पहिल्या नावाने बोलावण्याचा आदेश काढला होता. आता एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पहिल्या नावाची नेमप्लेट असणार आहे. याची अंमलबजावणी 1 मार्च पासून केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातिवाद समोर आला. पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचा आरोप वारंवार केला जातोय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे पावलं उचलत आहेत.(स्रोत:abp माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज